'त्या' कार्यक्रमाला राज ठाकरेंनादेखील बोलवा; आशिष शेलारांचं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 04:34 PM2021-10-15T16:34:51+5:302021-10-15T16:36:57+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरेंसाठी भाजप नेते आशिष शेलारांची जोरदार बॅटिंग
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राज ठाकरेंना आमंत्रित करायला हवं होतं, असं मत शेलारांनी पत्रातून व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्याबद्दलही शेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला प्रथेप्रमाण विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित केलं असतं, तर अधिक आनंद झाला असता, अशी भावना शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या ग्रंथ प्रकल्पाबद्दल सरकारचं अभिनंदन करतो, असं शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा व्यासंग आणि वारसा असणारे राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाला बोलावून एक चांगला संदेश देता आला असता, असं शेलारांनी पत्रात नमूद केलं आहे. ज्या ज्या वेळी राज ठाकरे यांना भेटतो, त्या त्या वेळी त्यांच्या तोंडून प्रबोधनकारांचे ज्याज्वल्य विचार ऐकायला मिळतात. अद्यापही या कार्यक्रमाच निमंत्रण त्यांना देता येईल. या व्यासपीठावर राज ठाकरे आले तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल, असं शेलारांनी पत्रात म्हटलं आहे.
प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असलेले, त्यांचे नातू मा. श्री. राज ठाकरे यांना या कार्यक्रमला राजशिष्टाचारानुसार आमंत्रित करुन एक चांगला संदेश शासनाला देता आला असता अथवा देता येऊ शकतो. अर्थात त्यांनी आमंत्रण स्वीकारावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असं शेलारांनी पत्रात नमूद केलं आहे. प्रबोधनकारांचे पणतू राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांसह कुटुंबातील सदस्यांचाही यथोचित सन्मान व्हावा, अशी इच्छादेखील शेलारांनी व्यक्त केली आहे.