BJP 12 MLAs: भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी; विधानभवन सचिवांना लिहिलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 05:50 PM2022-01-31T17:50:26+5:302022-01-31T17:51:08+5:30
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्याची कारवाई करण्यात आली होती.
BJP 12 MLAs vs Mahavikas Aaghadi: महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या १२ आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याची बाब भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानभवन सचिवांना पत्र लिहून कळवली. यासोबतच, न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे त्या १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला केला जावा, अशी मागणी शेलार यांनी पत्राद्वारे केली.
विधानसभेने भाजपाच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून याबाबत आम्ही आज अवगत केले. सोबत न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांची प्रतही आम्ही जोडलेय! pic.twitter.com/rypuJPYibn
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 31, 2022
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना विधानभवनात गैरवर्तणुक केल्याचा ठपका ठेवत एका वर्षासाठी निलंबित केले होते. त्या विरोधात १२ आमदारांतर्फे आमदार अँड आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल २८ जानेवारीला आला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले. त्यामुळे याबाबत १२ आमदारांच्या वतीने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती दिली. तसेच निवाड्यांची प्रतही सोबत जोडली.
न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे, याकडे विधानसभा सचिवालयाचे त्यांनी लक्ष वेधले आणि आता विधानभवनात १२ आमदारांना प्रवेश देण्यात यावा अशी नम्र विनंती पत्राच्या माध्यमातून केली.