भाजप आमदाराने संजय राऊतांना दिली पुस्तके; राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 05:30 PM2022-12-21T17:30:18+5:302022-12-21T17:30:27+5:30
भाजप आमदाराने संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तके भेट म्हणून पाठवली.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून महापुरुषांच्या होत असलेल्या अवमानाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक आहेत. सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसात उमटत आहेत.
अधिवेशनाच्या सुरुवातीला चंद्रकांत पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट म्हणून दिले होते. त्यानंतर आता भाजप आमदार भाई गिरकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तके भेट म्हणून पाठवली. पण, संजय राऊत यांनी ती पुस्तके इतरांना दिली आहेत.
संजय राऊत यांची पोस्ट
संजय राऊत यांनी एका फेसबूक पोस्टमधून गिरकर यांच्या पुस्तकांचा नम्रपणे स्विकार केला आणि ती पुस्तके चंद्रकांत पाठील आणि रामभाऊ म्हाळघी प्रतिष्ठान ग्रंथालयाला भेट दिली. आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत म्हणाले की, "आपण आवर्जुन पाठवलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती सांगणारी दोन्ही पुस्तके मिळाली. आपण पाठवलेली दोन्ही पुस्तके माझ्या संग्रही होतीच व प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही असावेत असे चित्रमय ग्रंथ आहेत.''
''डॉ. आंबेडकर हे युगप्रवर्तक महानायक आहेत. डॉ. आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. आपण पाठवलेल्या दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक मी रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान ग्रंथालयास तर दुसरे पुस्तक मान. चंद्रकांत पाटील यांच्या आवलोकनार्थ पाठवीत आहे,'' असे राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.