पवारांच्या पोपटाचा लेख वाचला आणि....; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:31 PM2023-09-02T16:31:29+5:302023-09-02T16:32:06+5:30
सामना अग्रलेखावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा दाखला देत राऊतांवर टीकास्त्र सोडले.
मुंबई – पटणा, बंगळुरूनंतर इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीचं नियोजन उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. इंडियाच्या बैठकीसाठी देशातील २८ पक्षाचे प्रमुख नेते मुंबईत आले होते. या बैठकीत मोदी सरकारविरोधात रणनीती ठरवण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी जिथे शक्य असेल तिथे एकत्रित निवडणूक लढवण्याचा ठराव समंत झाला. या बैठकीनंतर सामना अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली होती. त्यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, पवारांच्या पोपटाचा सामनाचा लेख वाचला आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवला “‘गाढव शृंगारीले कोडे।काही केल्या नोहे घोडे॥ त्याचे भुकंने न राहे।स्वभावासी करील काय॥ श्वान शिबिके बैसवीले।भुंकता न राहे उगले॥ तुका म्हणे स्वभाव कर्म।काही केल्या न सुटे धर्म॥ असं ट्विट करत त्यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना टॅग केले आहे.
पवारांच्या पोपटाचा सामनाचा लेख वाचला आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवला
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 2, 2023
‘गाढव शृंगारीले कोडे।काही केल्या नोहे घोडे॥
त्याचे भुकंने न राहे।स्वभावासी करील काय॥
श्वान शिबिके बैसवीले।भुंकता न राहे उगले॥
तुका म्हणे स्वभाव कर्म।काही केल्या न सुटे धर्म॥’@rautsanjay61@BJP4Maharashtrapic.twitter.com/dB0YXhC6tS
काय म्हटलं होतं सामना अग्रलेखात?
चार गाढव एकत्र चरत असले तरी हुकुमशाहाला दरदरून घाम फुटतो, त्याला वाटते की, आपल्याविरुद्ध कारस्थाने करून सत्ता उलथवीत आहेत. इकडे मुंबईत तर देशाच्या राजकारणातील २८ प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते २ दिवस एकत्र जमले. त्यांनी देशातील हुकुमशाही राजवट उलथवून टाकण्याचा एल्गार केला. त्यामुळे मोदी सरकारला इंडियाची धास्ती वाटणारच. इंडिया आघाडीचे युद्ध हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात आहे असं सामना अग्रलेखात म्हटलं होतं.
त्याचसोबत सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचवण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना चले जाव, भारत छोडोचा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून हुकुमशाही चले जावचा आदेश इंडिया आघाडीने दिला आहे. इंडिया जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाहीचा विजय होईल. स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापी संपलेले नाही असंही त्यात नमूद केले होते.