“शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?”; भाजपा आमदाराचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:23 IST2024-12-08T15:21:07+5:302024-12-08T15:23:11+5:30
Maharashtra Politics: ईव्हीएमवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.

“शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?”; भाजपा आमदाराचा सवाल
Maharashtra Politics: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. ईव्हीएमवर आरोप करत त्याविरोधातील भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावून धरली आहे. यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.
शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांतील आकडेवारी मांडली आणि काही उदाहरणे समोर ठेवली. तसेच पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असे ट्विट एक्सवर शेअर करत विरोधकांना टोला लगावला. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला शरद पवारांनी भेट दिली. यावेळी मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणे, तुमचे म्हणणे ऐकून घेणे चुकीचे आहे? लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्याबद्दल जाणून घेणे, त्याचे निरसन करणे चुकीच आहे का? अशी विचारणा करत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. हम करे सो कायदा यासारखे शरद पवार वागत आहेत. शरद पवार लोकशाही मानत नाहीत. जे नातेवाईक निवडून आले ते ईव्हीएम घोटाळ्याने निवडून आलेत का? हे आता ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली.
दरम्यान, यापूर्वी झारखंड, कर्नाटकमध्ये ईव्हीएमवर मतदान झाले. आता प्रियंका गांधी जिंकल्या आहेत. जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचे आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा खरा म्हणजे दुटप्पीपणा आहे. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? विरोधी पक्षाकडे आता कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. सर्व घटकांनी राज्यातील विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली आहे. कारण घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. विरोधी पक्षाला माझे आव्हान आहे, रडगाणं थांबवा, रडगाणे बंद करा आणि विकास गाणे सुरू करा, अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले.