शरद पवारांचा एकेरी उल्लेख, रोहित पवारांवरही बरसले; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:41 PM2023-06-05T12:41:47+5:302023-06-05T12:43:19+5:30
जेजुरी संस्थानने अहिल्यादेवींचा पुतळा गडावर बसवला. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही असं पडळकरांनी म्हटलं.
सोलापूर - गेल्यावर्षी ३१ मे रोजी शरद पवारांनी चौंडीत जाऊन अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यंदा शरद पवार का आले नाहीत. ४ वेळा मुख्यमंत्री होते, १२ वर्ष केंद्रात मंत्री होते. १९९९ पासून राज्यात त्यांचे सरकार होते. एकदाही आले नव्हते. गेल्यावर्षी चौंडी त्यांना आपल्या हातातून काढून घ्यायची होती. परिवर्तनाचे केंद्र जागरूक ठेवले पाहिजे असं सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकेरी भाषेत पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, जेजुरी संस्थानने अहिल्यादेवींचा पुतळा गडावर बसवला. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी होळकरांची आहे. ते मंदिर होळकरांनी बांधले. एका वृत्तपत्रात अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे पाहणी करताना शरद पवारांचा फोटो पाहिला. माझ्या डोक्यात विचार आला काहीतरी गेम सुरू आहे. त्यानंतर १५ दिवसांनीच शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण होणार, त्यांचा संबंध काय, कारण आम्ही काहीतरी करतोय हे पवारांना दाखवायचे होते. आमची भावना चांगली आहे असं दाखवायचे होते. म्हणून आम्ही तो प्रकार हाणून पाडला. कुणालाही काही न समजता पहाटे ५ वाजता पोरं जेजुरी गडावर पोहचली. पहाटेच उद्धाटन करून टाकले असं त्यांनी सांगितले.
तसेच चौंडीतही तेच करायचे होते. चौंडी हायजॅक करायची होती. सांगलीतही तेच केले. अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी हजारो पोलीस बंदोबस्ताला लावले. आपल्या अशोक मरगळे यांनी मेंढपालाच्या हस्ते उद्धाटन केले. हा डावही आम्ही हाणून पाडला. मागच्यावर्षी पळताभुई केली होती. कारण माझ्यासोबत तुम्ही होता. राजकारण वेगळे असते पण आपल्या अस्मितेला माणूस हात घालतो. केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जागरूक झाले पाहिजे असं आवाहनही गोपीचंद पडळकर यांनी केले.
रोहित पवारांवरही घणाघात
चौंडीच्या कार्यक्रमात मी प्रसाद वाटत होतो असं रोहित पवार सांगतात, तुम्ही आता प्रसाद वाटायच्या कामाला आहे. आमच्या लोकांनी आयुष्यभर तुला प्रसाद वाटला आणि तू वाट की दुखतंय का? प्रसाद वाटल्याचे टीव्हीवर सांगायचे असते. धनगर किती बकरे कापतात हे माहिती नाही का तुला. धनगर उपाशी आले होते का तिथे? मी प्रसादाचे काम बघत होतो ते रोज सांगतोय. दरवर्षी वाट, परिवर्तन झाले पाहिजे असा टोला गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांना लगावला.