Maharashtra Politics: “शरद पवार कधीही विश्वासाने वागले नाहीत, उद्धव ठाकरेंचाही ‘ओक्के कार्यक्रम’...”; भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:21 PM2022-09-27T19:21:32+5:302022-09-27T19:22:22+5:30
Maharashtra Politics: शरद पवारांसोबत अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि नवे शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बंडखोर शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटही या टीकेचा खरपूस समाचार घेताना दिसत आहे. यातच भाजप आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधताना, शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत, असा मोठा आरोप केला आहे.
शरद पवारांसोबत संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते? नवाब मलिक कुठे आहेत आज? अनिल देशमुख कुठे आहेत आज? जो राज्याचा गृहमंत्री सगळे पोलीस खाते चालवत होता, तो कधी आत गेला त्यालाही कळले नाही, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
बाळासाहेबांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले नसते
राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले नसते. सरकारच्या बाहेर बसणे पसंत केले असते. तुम्ही शरद पवारांसोबत सरकार केले. शरद पवारांनी आजपर्यंत एकही गोष्ट विश्वासाने केलेली नाही. शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत. त्यांच्यासोबत जे कुणी गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला. काँग्रेस त्यांच्यासोबत गेली, काँग्रेसची काय अवस्था झाली तुम्ही बघत आहात. काँग्रेस कमी होती म्हणून की काय उद्धव ठाकरे गेले. पण उद्धव ठाकरे तर मोकळेच झाले, या शब्दांत जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, सत्ता आली तर उतू नका, मातू नका. आपल्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तिचे सोने करा आणि लोकांची मनापासून सेवा करा, असा सल्लाही जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला.