Maharashtra Political Crisis: रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर? बड्या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “सब कतार में है”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:15 PM2022-07-26T12:15:23+5:302022-07-26T12:17:30+5:30
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे खळं उठवलंय, वस्ती उठायला वेळ लागणार नाही. योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम होईल, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ता स्थापन केल्यापासून भाजपने पुन्हा आपले मिशन लोटस सुरू केल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातच आता विधान परिषदेची निवडणूक जिंकून पुन्हा सभापतीपदी विराजमान झालेले रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. एका भाजप नेत्याने याबाबत सूतोवाच केले असून, अनेक जण रांगेत उभे आहेत, असा मोठा दावा केला आहे.
कोरेगाव विधानसभा मतदासंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर भाष्य केले. जिल्ह्यात रामराजेंच्या भाजप प्रवेशावर जोरदार चर्चा सुरू आहेत, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे खळ उठलेय, वस्ती उठायला जास्त वेळ लागणार नाही, असा सूचक इशारा दिला. ते साताऱ्यात बोलत होते.
सब कतार में है...
राष्ट्रवादीचे खळ उठवले आहे, वस्ती उठायला वेळ लागणार नाही, आता बोजा बिस्तरा गुंडाळायला जास्त वेळ लागणार नाही, असा टोला लगावत, आमच्याकडे मोठी रांग लागली आहे. त्यामुळे सब कतार मै है, योग्य टायमिंग आल्यावर ते कार्यक्रम करतात. ज्यांना दादागिरीपासून मुक्तता पाहिजे, खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, अशा सगळ्यांना मुख्यमंत्री सोबत घेतील अशी खोचक टीका महेश शिंदे यांनी केली.
दरम्यान, रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज आहेत. विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर हे भाजप आमदार आहेत. नार्वेकर सध्या विधानसभा अध्यक्षपदावर विराजमान आहेत. विधानपरिषदेच्या सभापतीपदी सासरे, तर विधानसभा अध्यक्षपदी जावई अशी जोडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जावयापाठोपाठ सासरेही भाजपमध्ये येणार का, याची चर्चा आहे.