लाचखोरीच्या आरोपातून भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची निर्दोष सुटका

By admin | Published: November 8, 2016 05:49 PM2016-11-08T17:49:13+5:302016-11-08T17:49:13+5:30

भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांची लाचखोरीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायलायने मेहता यांना क्लीन चिट दिल्यानंतर मीरा-भाईंदरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात आतिषबाजी केली

BJP MLA Narendra Mehta acquitted of blame for bribery charges | लाचखोरीच्या आरोपातून भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची निर्दोष सुटका

लाचखोरीच्या आरोपातून भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची निर्दोष सुटका

Next

ऑनलाइन लोकमत

भाईंदर, दि. 8 - भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांची लाचखोरीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायलायने मेहता यांना क्लीन चिट दिल्यानंतर मीरा-भाईंदरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात आतिषबाजी केली. गेल्या 14 वर्षांपासून या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता. भाईंदर पूर्वेकडील रेल्वे फाटकाजवळील विकास इंडस्ट्रियल इस्टेटमधील हेमंत पटेल या कारखानदाराच्या औद्योगिक गाळ्याच्या दुरुस्तीचे काम हनुमंत मालुसरे आणि काशिनाथ ढाणेकर या बांधकाम व्यावसायिकांना 2 लाख 40 हजार रुपयांचा कराराने देण्यात आले.
 
मात्र, दुरुस्तीचे हे काम बेकायदा असल्याचा दावा करत त्यावेळी स्थानिक नगरसेवक असलेले नरेंद्र मेहता यांनी बांधकाम उरकण्यासाठी मालुसरे आणि ढाणेकर यांच्याकडे 51 हजारांची लाच मागितल्याचा आरोप होता. बांधकामात 1 लाखांचा नफा होणार असल्याचे त्या बांधकाम व्यावसायिकांनी मेहता यांना 51 हजार रुपये देण्यास असमर्थता दर्शवली. पण, कामात अडसर निर्माण होऊ लागल्याने मालुसरे यांनी ठरलेली रक्कम मेहता यांना द्यायला सहमती दर्शवली. त्यातील पहिला हप्ता 27 डिसेंबर 2002 रोजी मेहता यांच्या कार्यालयात देण्याचे ठरवण्यात आले.
 
याची तक्रार ढाणेकर यांच्या खेरीज मालुसरे यांनी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. लाच स्वीकारताना विभागाच्या पथकाने मेहता यांना रंगेहाथ अटक केली. पाच दिवसाच्या कोठडीनंतर जामिनावर सुटलेल्या मेहता यांच्यावर ठाणे जिल्हा न्यायालयात खटला सुरू झाला. तब्बल आठ वर्षानंतर पार पडलेल्या अंतिम सुनावणीत न्यायाधीश सईद यांनी मेहता यांचा नगरसेवक, लोकसेवकाच्या कक्षेत येत नसल्याचा दावा मान्य करत त्यांची निर्दोष सुटका केली. 
 
याविरोधात मालुसरे व  राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर 3 मार्च 2012 मध्ये झालेल्या अंतिम सुनावणीत मेहता यांना नगरसेवक लोकसेवकाच्या कक्षेतच येत असल्याचा निर्वाळा देत मेहता यांना दोषी मानले. या निकालाविरोधात मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 2015 मध्ये त्यावर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश जगतसिंग खेकर व सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णयावर शिक्कामोर्तब करत खटला कनिष्ठ न्यायालयातच चालवण्याचे निर्देश दिले.
 
त्यानुसार पुन्हा जिल्हा न्यायालयात सुरू झालेल्या या खटल्याच्या युक्तिवादाला नव्याने सुरुवात झाली. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद संपुष्टात आल्याने न्यायालयाने मंगळवारी अंतिम  निकाल जाहीर केला. न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी मेहता यांनी लाच घेतल्याप्रकरणात सदोष आढळून येत नसल्याचा निर्वाळा देत त्यांची निर्दोष सुटका केली. राज्य सरकार व मालुसरे यांच्या बाजूने वकील संगीत फड व मेहता यांच्या बाजूने वकील आबाद कोंडा यांनी युक्तिवाद केला. मेहता यांची निर्दोष सुटका झाल्यामुळे पालिका मुख्यालयात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. दरम्यान,  मालुसरे यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. 
 

 

Web Title: BJP MLA Narendra Mehta acquitted of blame for bribery charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.