शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादीत विलीन करणार; भाजपा नेत्याने असा दावा का केला?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:05 PM2023-05-31T13:05:28+5:302023-05-31T13:06:30+5:30
उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेची किती मन की बात ऐकली का केवळ पाटणकरांच्या मन की बात ऐकली हे सांगावे असं नितेश राणेंनी म्हटलं.
मुंबई - येत्या १९ जून रोजी उद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उबाठा शिवसेना विलीन करण्याची घोषणा करणार आहेत. त्याबाबत बोलणी झालेली आहेत. विनायक राऊत शंभुराज देसाईंबाबत बोलले ते राऊतांना खरे वाटते. त्यात तथ्य वाटते. जर ते तथ्य असेल तर मी जी माहिती देतोय. उद्धव ठाकरे गट हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होतेय, याची घोषणा १९ जूनला उद्धव ठाकरे करणार आहेत हीदेखील तथ्य आहे असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी उद्धव ठाकरेंची आहे. संजय राऊतांनी २०० कोटी घेऊन महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला. आता राऊतांना उद्धव ठाकरेंची समजूत घालण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीत विलीन करा यासाठी १०० कोटींची ऑफर मिळाली आहे. तुमची आणि उद्धव ठाकरेंची महाराष्ट्राच्या राजकारणात किती लायकी राहिली त्यावर अग्रलेख लिहावा असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. उबाठा गटाची स्थापना १० ऑक्टोबर २०२२ ची आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नाही. ज्यांच्या हातात पक्ष नाही ते अधिकृत वर्धापन दिन कसा साजरा करू शकतात. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिला आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा हा बेकायदेशीर आहे. स्वत: राजकीय लावारिस असलेल्यांनी दुसऱ्यांच्या आईवडिलांवर बोलू नये असंही नितेश राणेंनी टीका केली.
भाजपा-शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवर फडकणार
भाजपाचा झेंडा हा हिंदुत्वाचा प्रतीक आहे, मराठी माणसाचा अभिमान आहे. या मराठी माणसाला तुम्ही मुंबईतून हद्दपार केले. मराठीचा टक्का बघा, तुमच्या दलालीमुळे हे झाले. उद्धव ठाकरे लंडनला गेलेत ते कोणाच्या पैशावर गेलेत? कार खरेदी करण्यासाठी, परदेश दौऱ्यासाठी व्यापारी चालतात. लंडनमधील हॉटेल आणि शॉपिंगचे बिल कोण देतेय? याचे नाव जाहीर करू का? मुंबई महापालिकेवर भाजपा-शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे. तो भगवाच आहे असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.
उद्धव-आदित्य ठाकरेंवर निशाणा
त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेची किती मन की बात ऐकली का केवळ पाटणकरांच्या मन की बात ऐकली हे सांगावे. महाराष्ट्र म्हणजे पाटणकर, पाटणकर म्हणजे महाराष्ट्र हेच घोषवाक्य उद्धव ठाकरेंचे होते. राज्यातील जितकी टेंडर वैभव चेंबरमध्ये बसून कोण ठरवायचे? पाटणकरांच्या दावणीला महाराष्ट्र बांधला त्यावरही बोलायला हवे. कायदा खोक्यांवर नाचतो असं विधान करतात. हे तुम्हीच करू शकतात. कारण आरेच्या गेस्ट हाऊसमध्ये कोण कुठे काय नाचत होते हे तुम्हाला बघण्याची सवय असल्याने सर्व गोष्टी खोक्यांवर दिसणार यात शंका नाही. मविआ सरकार असताना आदित्य ठाकरे रिझवी कॉलेजच्या मागे दिनो मोर्याचे घर आहे तिथे कोणाकोणाला नाचवायचा? याचीही माहिती दिली पाहिजे असंही नितेश राणेंनी म्हटलं.
संजय राऊत दलाली करतात
मोदी सरकारबद्दल संजय राऊतांनी आरोप केले. पण मोदी सरकारच्या कारभारामुळे दहशतवादी, भ्रष्टाचारी यांच्या नाकीनऊ आलेले आहे. २ हजार नोटांचे करायचे काय? याचा विचार करून ४ वेळा घरी डॉक्टर बोलवायला लागले आहेत. मोदी सरकारच्या ९ वर्षात देशाने जी प्रगती केली, दहशतवाद्यांना आळा बसला. भारताकडे वाकड्या नजरेने कुणी पाहू शकत नाही हे चित्र जगात आहे. ही परिस्थिती राजकीय दलालांना कधीच पाहवणार नाही. संजय राऊत कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेसची दलाली करतात. या देशाला मोदी सरकारने किती उंचीवर नेले हे तुम्हाला कळणार नाही. कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढली. त्यात केवळ एकाच उद्योगपतीचा हात आहे त्यांनी एकाच पाटणकरांच्या हातात उद्धव ठाकरेंनी अख्खे मविआ सरकार दावणीला का बांधले होते. दिनो मोर्याचे लाड का पुरवले याचे उत्तर द्यावे असा इशारा संजय राऊतांना नितेश राणेंनी दिला.