'हा कार्टा सिंधुदुर्गाच्या मातीत कसा जन्मला हेच कळत नाही'; नितेश राणेंची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 04:20 PM2021-11-12T16:20:55+5:302021-11-12T16:23:07+5:30
'मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, मी अनिल परब यांच्या घरी नेऊन सोडतो.'
मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्या, तर काहींची प्रकृती खराब झाली. दरम्यान, याच संपावरुन भाजप नेते नितेश राणे (Nitesh rane) यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांच्यावर जहरी टीका केली आहे.
आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Strike) सुरू आहे. त्या ठिकाणी जाऊन नितेश राणेंनी आंदोलकांची भेट घेतली आणि माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. 'अनिल परबसिंधुदुर्गातील आहेत, पण आमच्या मातीत हा कार्टा कसा जन्मला हेच कळत नाही. मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, मी अनिल परब यांच्या घरी नेऊन सोडतो, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
वसुली करुन उद्धव ठाकरेंना द्यावी लागते
राणे पुढे म्हणाले, अनिल परब यांना बदाम पाठवा, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. डोक्यावर चार-पाच केस राहिले म्हणून त्याला काही कळत नाही. हा जी वसुली करतो ती सर्व उद्धव ठाकरेंना द्यावी लागते. उद्धव ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया झाली. पण उद्धव ठाकरेंना कणा दिला आहे का? असा प्रश्न पडतो. शाहरुखचा मुलगा जेलमध्ये असताना यांना झोप देखील लागत नाही. विलीनीकरण झाले तर अनिल परब वसुली कशी करणार? अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.
कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पेटवून देऊ
राणे पुढे म्हणतात, कर्मचाऱ्यांनो तुम्ही आत्महत्या का करता? सरकारमधील एक ते दोन लोकांना घेऊन जाऊ की. तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र पेटवू. आपण शिवरायांच्या राज्यात राहतो, आत्महत्या हा पर्याय नाही. 93च्या ब्लास्टमधील मंत्री सरकारच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. जर कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याची गाठ नितेश राणे सोबत आहे. निलंबन केल्यानंतर हे मंत्री कसे राज्यात फिरतात ते आम्ही बघतो, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.