महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:11 PM2024-09-03T19:11:34+5:302024-09-03T19:12:39+5:30
BJP Pankaja Munde News: छत्रपती आमच्या हृदयात आहेत. पुतळ्याची घटना दुर्दैवी आहे. परंतु, खुद्द पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर तिथेच विराम मिळतो, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
BJP Pankaja Munde News: भाजपाने अनेक नेत्यांना काही मतदारसंघात दौरा करण्यास सांगितले आहे. हा संघटनेचा दौरा आहे. संघटनेच्या विधानसभा मतदारसंघांनुसार हा दौरा आहे. यावेळेस बैठका होणार आहेत. या बैठकीत १०० ते १५० पदाधिकारी अपेक्षित आहेत. त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. यामध्ये संघटनात्मक विषय हाताळायचे आहे. ही विधानसभेची पूर्वतयारी आहे, असे म्हणायला हरकत नाही, असे आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, येथील बंडखोरी रोखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीवेळी दरवर्षी इच्छुकांची संख्या मोठी असते. परंतु, दरवर्षी आम्ही मार्ग काढतो. इच्छूक उमेदवारांच्या यादीतून एक उमेदवार द्यावा लागतो. त्याची चांगली प्रॅक्टिस पक्षाच्या कोअर कमिटीला आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती आमच्या हृदयात आहेत
ज्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत नम्रपणे छत्रपती शिवरायांविषयीचा आदर, त्यांच्याविषयी असणारे खरे प्रेम दाखवले आणि सांगितले की, या घटनेबाबत क्षमा मागतो. कधी कधी समाजात काही घटना घडतात. त्या घटनांवर राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावे. पण, मोदीजींनी आदर्श ठेवला आहे की, घडलेल्या घटनेबाबत क्षमा मागतो. पुतळ्याची घटना दुर्दैवी आहे. परंतु, खुद्द पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर तिथेच विराम मिळतो. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. चौकशी करण्यात येईल. त्यावर आणखी खूप किस पाडण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. छत्रपती आमच्या हृदयात आहेत. पुतळा पडल्याची वेदना पंतप्रधानांपासून आमच्या सर्वांच्या मनात आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, तानाजी सावंत यांच्या विधानांबाबत प्रश्न विचारण्यात आले. परंतु, कोणताही नेता असो, त्यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या जीवनात अमूक माणूस तमूक बोलला म्हणून बोलत नाही. माझ्या भूमिकांवर मी बोलते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आगामी काळात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता, यावर, तुम्ही परत बातमी काढायचा प्रयत्न करत आहात, असे सांगत पंकजा मुंडे यांनी यावर अधिक भाष्य केले नाही.