Tata Airbus Project: “सुभाष देसाई उत्तर द्या, आम्हाला तोंड उघडायला लावू नका”; भाजप नेत्याचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 01:28 PM2022-10-28T13:28:04+5:302022-10-28T13:29:10+5:30
Tata Airbus Project: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी टाटा एअरबस प्रोजेक्ट का गेला, याची उत्तरे द्यावीत, अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे.
Tata Airbus Project: वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन करणार आहेत. यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापलेले पाहायला मिळत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच विरोधकांच्या आरोपांना भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधक टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याव्यतिरिक्त काहीच करत नाहीत. टाटा एयरबस, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्रातून गेला असून, याची उत्तरे महाविकास आघाडीतील नेत्यांनीच दिली पाहिजेत, असे ट्विट प्रसाद लाड यांनी केले आहे. तसेच यासोबत एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सुभाष देसाई आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याची उत्तरे द्यायला हवीत, अशी मागणी केली आहे.
सुभाष देसाई यांनी याचे उत्तर दिले पाहिजे
महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. २१ सप्टेंबर २०२१ मध्येच एअरबस-टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचे आहे. सुभाष देसाई यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
सुभाष देसाईंनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये
तसेच येणाऱ्या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवे. भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? या गोष्टी जर आम्ही काढत बसलो तर मोठे प्रकरण समोर येईल. किती उद्योगांकडून किती पैसे घेतले, फाईल कशा फिरल्या याची सर्व माहिती प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडे आहे. सुभाष देसाई यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर असेच आधारहीन आरोप होत राहिले तर राज्यातील प्रकल्प कोणामुळे गेले, याची जंत्री आम्हाला जनतेसमोर उघडावी लागेल, असा इशारा प्रसाद लाड यांनी यावेळी दिला.
दरम्यान, वायुसेनेसाठी सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनविण्याची जबाबदारी टाटा एअरबसला सोपविली आहे. कंपनी बडोदा येथील प्लांटमध्ये याची निर्मिती करणार आहे. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेससोबत सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या करारावर सही केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"