भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:28 AM2024-02-23T10:28:29+5:302024-02-23T10:29:13+5:30
BJP MLA Rajendra Patni passed away: भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. दीर्घ काळापासून आजारी असलेल्या पाटणी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र पाटणी हे वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते.
भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. दीर्घ काळापासून आजारी असलेल्या पाटणी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र पाटणी हे वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते. त्याआधी त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणूनही काम पाहिले होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2024
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला… pic.twitter.com/LsvH0n4upq
राजेंद्र पाटणी हे १९९७ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यानंतर २००४ मध्ये ते कारंजा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्येही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मागच्या काही काळापासून ते आजारी होते. त्यातच त्यांच निधन झालं.