भाजपाचे आमदार राम कदम यांच्यामुळे परिचारकांचा पगार रोखला
By अतुल कुलकर्णी | Published: September 6, 2018 01:23 AM2018-09-06T01:23:41+5:302018-09-06T01:23:59+5:30
निलंबन रद्द केल्यामुळे त्यांचा आमदार म्हणून मिळणारा पगार त्यांना द्यावा, असा विषय बुधवारी झालेल्या बैठकीत आला होता.
मुंबई : भाजपाचे आ. राम कदम यांनी दहीहंडीच्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत असताना भाजपाचेच दुसरे आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबन काळातला पगार देण्याचा व त्यांचा विधानभवनातील प्रवेश सुरूकरण्याचा निर्णय घेतला तर वातावरण आणखी खराब होईल असे सांगत विधिमंडळात झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय न घेता हा विषय लांबणीवर टाकण्यात आला.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठक बोलावली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते अनिल परब, राष्टÑवादीचे नेते हेमंत टकले यांच्यासह विविध गटनेते उपस्थित होते. परिचारक यांनी पंढरपुरात भाजपाच्या प्रचार सभेत भाषण करताना सैनिक सीमेवर लढत असतात आणि त्यांच्या बायका इकडे बाळंत झाल्या की ते तिकडे पेढे वाटतात, असे संतापजनक विधान केले होते. त्यावरुन भाजपाला तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर परिचारक यांचे निलंबन केले. मात्र गेल्यावर्षी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीने गदारोळ केला. त्यामुळे निलंबन रद्द पण त्यांना विधानभवन परिसरात येता येणार नाही, असा आदेश सभापतींनी दिला.
निलंबन रद्द केल्यामुळे त्यांचा आमदार म्हणून मिळणारा पगार त्यांना द्यावा, असा विषय बुधवारी झालेल्या बैठकीत आला होता. मात्र दहिहंडीच्या दिवशी भाजपाचे आ. राम कदम यांनी मुलगी पसंत असेल तर पळवून आणून देईन, असे विधान केल्याने पुन्हा राज्यभर भाजपाच्या विरोधात वातावरण सुरूझाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आ. परिचारक यांना पगार दिला तर आणखी आगीत तेल टाकल्यासारखे होईल, असे सांगून बैठकीत जमलेल्या सदस्यांनी हा निर्णय आज घेऊच नये अशी भूमिका घेतली. मंत्री पाटील यांनी देखील भाजपासाठी हा अडचणीचा विषय होईल असे सांगत यावर निर्णय आत्ता नको असे स्पष्ट केले. तर शिवसेनेचे आ. परब यांनी जर हा निर्णय घेतला तर आम्ही राज्यभर आंदोलन करु, अशी भूमिका घेतली. आता पगारही नाही आणि विधानभवनात येता येणार नाही, अशी स्थिती आ. परिचारक यांची झाली आहे.