कर्जमाफीचा निर्णय धूळफेक करणारा: संतोष दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 12:38 PM2019-12-22T12:38:59+5:302019-12-22T12:40:15+5:30
शेतकऱ्यांची सातबारा कोरा करण्याची मागणी होती. मात्र तो शब्द हे सरकार पाळत नसल्याचे आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीची ही घोषणा केल्यानंतर मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारने शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. तर सरकराने केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे धूळफेक करणारा निर्णय असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र व भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी केली आहे.
नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरत विरोधकांनी सरकाराला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अधिवेशनात कर्जमाफी होणार नसल्याचे संकेत सत्ताधारी पक्षाकडून देण्यात येत होते. परंतु अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'सर्जिकल स्ट्राइक' करत शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्यांनतर राजकीय वर्तुळातून या विषयी विविध प्रतिक्रिया येत आहे.
शेतकऱ्यांची सातबारा कोरा करण्याची मागणी होती. मात्र तो शब्द हे सरकार पाळत नसल्याचे आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर सरकार स्थापन करताना आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी असल्याच्या घोषणा सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी केल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करू अशी जाहीर वाच्छता करून या लोकांनी लोकप्रियता मिळवली.प्रत्यक्षात मात्र दोन लाखावरच शेतकऱ्यांची बोलवण केली, असल्याची टीका संतोष दानवे यांनी सरकारवर केली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारने 2 लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी यावर आक्षेप घेतला असून, शेतकऱ्यांचा सात-बारा करण्याची मागणी केली आहे. तर कर्जमाफीच्या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.