भाजपा आमदाराचा पेट्रोल पंप सील
By admin | Published: May 10, 2017 02:15 AM2017-05-10T02:15:37+5:302017-05-10T02:15:37+5:30
भाजपाचे आमदार भीमराव धोंडे यांच्या पेट्रोल पंपाला गुणनियंत्रक पथकाने मंगळवारी सील केले. भेसळयुक्त इंधन विक्री होत
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (बीड) : भाजपाचे आमदार भीमराव धोंडे यांच्या पेट्रोल पंपाला गुणनियंत्रक पथकाने मंगळवारी सील केले. भेसळयुक्त इंधन विक्री होत असल्याच्या संशयावरुन ही कारवाई झाल्याचे समजते, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
आ. धोंडे यांचा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारत पेट्रोलियमचा पंप आहे. मंगळवारी दुपारी सोलापूर येथील भारत पेट्रोलियमच्या गुणनियंत्रक पथकाने अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांनी पेट्रोल व डिझेलचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांनी पंपाला चिकटपट्टीने ‘सील’ लावून त्यावर शिक्का मारला. अधिकाऱ्यांना विचारले असता, कारवाईबद्दल आम्हाला माहिती देता येणार नाही. तुम्ही वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घ्या, असे त्यांनी सांगितले. आ. धोंडे यांनीही त्याचा खुलासा करणे टाळले. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक जीवन राऊत म्हणाले, भारत पेट्रोलियमचे पथक दरवर्षी तपासणीसाठी येत असते. त्यांच्या तपासणीला सहकार्य असून, उद्यापर्यंत पंप सुरळीत सुरू होईल.