भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या, बुलढाण्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 07:18 PM2024-07-31T19:18:28+5:302024-07-31T19:19:39+5:30
अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बुलढाणा: चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्या. यानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिय जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.
बुलढाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले अजय गिरी हे आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. ते सध्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. दरम्यान, अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
घरघुती कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय?
आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड असलेले अजय गिरी हे आज त्यांच्यासोबत ड्युटीवर नव्हते. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अजय गिरी यांनी घरघुती कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमकं कारण अद्याप समोर आले नाही.