विरप्पनसारखा अभिनंदन पंतप्रधान मोदींमुळे मायदेशात परतला; भाजपा आमदाराची मुक्ताफळं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 22:27 IST2019-04-10T21:48:10+5:302019-04-10T22:27:28+5:30
भाजपा आमदार सुरेश धस बरळले

विरप्पनसारखा अभिनंदन पंतप्रधान मोदींमुळे मायदेशात परतला; भाजपा आमदाराची मुक्ताफळं
औरंगाबाद: भारतीय हवाई दलातील विरप्पनसारखा अभिनंदन वर्धमान पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अवघ्या 60 तासात मायदेशी परतला, अशी मुक्ताफळं भाजपा आमदार सुरेश धस यांनी उधळली. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचं आणि खंबीर नेतृत्त्वाचं लक्षण असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी औरंगाबादमध्ये केलं. यानंतर आपण विरप्पन आणि अभिनंदन यांची तुलना करत नसल्याचं सांगत धस यांनी सारवासारव केली.
14 फेब्रुवारीला पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला. 26 फेब्रुवारीला भारतानं एअर स्ट्राइक केल्यावर 27 तारखेला पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई दलानं उधळून लावला. त्यावेळी आकाशात दोन्ही हवाई दलांच्या विमानांची चकमक झाली. त्यावेळी मिग-21 मधील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान पाडलं. मात्र त्यानंतर अभिनंदन यांचं विमान कोसळलं. त्याआधी त्यांनी स्वत:ची विमानातून सुटका केली. मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिकांच्य हाती लागले. जवळपास 60 तास ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. 1 मार्चला ते वाघा बॉर्डरवरुन मायदेशी परतले.
धस यांच्याआधी प्रदेशाध्यक्ष दानवे बरळले
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 5 एप्रिलला पुलवामा हल्ल्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. जालना लोकसभा मतदारसंघातील रामनगरमध्ये रावसाहेब दानवे प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. उद्धाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पुलवामात आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचं म्हटलं. रावसाहेब दानवेंनी जवानांना दहशतवादी संबोधलं. त्यामुळे रावसाहेब दानवेंना दहशतवादी आणि जवान यातील फरकच समजत नाही काय, असाही प्रश्न आता उपस्थित केला गेला. विशेष म्हणजे दानवेंनी दुसऱ्यांदा ही चूक केली. मार्चमध्येही दानवेंनी जवानांबद्दल बोलताना अतिरेकी शब्द वापरला होता.