भाजपाचे आमदार अडचणीत
By Admin | Published: June 22, 2016 04:11 AM2016-06-22T04:11:24+5:302016-06-22T04:11:24+5:30
डोंबिवलीचे भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात दलित समाजाविषयी आक्षपार्ह उद्गार काढल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे
ठाणे : डोंबिवलीचे भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात दलित समाजाविषयी आक्षपार्ह उद्गार काढल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्य मंत्रिमंडळातील समावेशाकरिता चव्हाण प्रयत्न करीत असताना या वक्तव्याच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील दलित समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रिपाइंसह राष्ट्रवादीनेही त्यांच्या विरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आ. चव्हाण यांनी दलित समाजाबद्दल अपशब्द काढल्याने मोहने येथे दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाळला. तर ठाण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसने आंदोलन करून चव्हाण यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)