"आधी योग्य माहिती घ्या मगच बोला"; जरांगे पाटील अन् प्रसाद लाड यांच्यात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:35 AM2024-07-19T10:35:36+5:302024-07-19T10:38:38+5:30
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी शिवीगाळ केल्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
BJP MLC Prasad Lad on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने रोष व्यक्त करत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी आलेल्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांनी शिवीगाळ केली. या सगळ्या प्रकरणावरुन आता प्रसाद लाड यांनी भाष्य केले आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली. मराठा समाजाला सरसकट आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत. याचसाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत. गुरुवारी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संताप व्यक्त केला. मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी, असे लाड यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी कॅमेरासमोर प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.
"तू किती पैसेवाला आहेस आणि तू किती भ्रष्टाचारी आहेस. मनोज जरांगेच्या नादी लागू नको. मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तुझं घर मोठं करणारी औलाद आहे तू. माझ्या नादी लागू नको. मी तुझं केव्हा नाव घेतलं का? आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नको. कारण आमच्या लेकरांचं वाटोळं झालंय," अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती.
प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर
"बाय द वे, मि. जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, 'नरेटिव्ह'ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या. हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी २०२३-२०२४ चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (६ जून २०२४ च्या जाहिरातीनुसार) त्यांच्याकडे २०२४-२५ या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले. आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी ६० वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या!," असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.