हर्बल तंबाखूचा वापर रोज केला तर मानसिक संतुलन बिघडतं, मोहित कंबोज यांचा मलिक यांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 08:33 PM2022-02-02T20:33:26+5:302022-02-02T20:33:35+5:30
महाराष्ट्रात भाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे आहेत, असं मलिक म्हणाले होते.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला (Wine sale in Super Market and General Stores) परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भाजपाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला. इतरही अनेकांनी या निर्णयाला विरोध केला. दरम्यान, बोलताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातभाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे असल्याचं विधानही त्यांनी केलं. यावरून आता मोहित कंबोज यांनी टोला लगावला आहे.
"हर्बल तंबाखूचा वापर जर माणसानं दररोज केला तर तो आपलं मानसिक संतुलन गमावतो. नवाब मलिक यांनी आज ज्याप्रकारचं वक्तव्य केलं, त्यावर हर्बल तंबाखूनं त्यांच्या डोक्यातील नसा डॅमेज केल्याचं दिसतंय. ज्यांच्या कुटुंबातील लोकांचं थेट कनेक्शन ड्रग्स, गांज्याच्या विक्रीशी आहे, ते दुसऱ्यांवर का बोट दाखवत आहेत?," असा सवालही कंबोज यांनी केला.
"आज वाईनच्या जे धोरण आहे, त्यातील भ्रष्टाचार, महाराष्ट्रातील लोकांना दारुडं बनवण्यावरून जेव्हा टीका होताना दिसली, तेव्हा आरोप भाजपच्या लोकांवर केला. तुम्ही पहिले आत्मचिंतन करायला हवं. कोण ड्रग्स पॅडलर्सचा प्रवक्ता आहे, कोणाशी कनेक्शन आहे, याचं उत्तर द्या. मी तुमच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि तुम्ही यावर माफी मागायला हवी," असंही ते म्हणाले.
My Reply Today To #NawabMalik On His Baseless Allegations On BJP Karyakarta’s ! pic.twitter.com/cbjHLv0Ywa
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 2, 2022
काय म्हणाले होते मलिक?
"महाराष्ट्रात सर्वात जास्त दारूच्या दुकानांचे परवाने आणि इतर दारूसंबंधीच्या गोष्टींमध्ये भाजपाच आघाडीवर आहे. मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात भाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते म्हणतात की आम्ही महाराष्ट्राचं 'मद्यराष्ट्र' होऊ देणार नाही. मग मध्य प्रदेश पॉलिसी पाहता त्याचं नाव 'मद्य प्रदेश' ठेवायचं का? त्या राज्यात नवीन प्रकारची दारू बनवण्यास परवानगी देण्यात आली असून त्यावर उत्पादन शुल्कही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी आधी त्याबद्दल बोलावं", असा सणसणीत टोला मलिकांनी भाजपाला लगावला.