“धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”: भाजपा खासदार अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:40 AM2024-03-28T10:40:31+5:302024-03-28T10:41:50+5:30
BJP MP Ashok Chavan: देशातील ८० ते ९० टक्के लोकांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता, असे सांगत अशोक चव्हाणांनी काँग्रेसला टोला लगावला.
BJP MP Ashok Chavan: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४०० पार असे लक्ष्य ठेवले असून, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत. भाजपा एकामागून एक उमेदवारी यादी जाहीर करत असून, अनेक ठिकाणी धक्कातंत्र वापरत असल्याचे दिसत आहे. भाजपामध्ये इन्कमिंगही मोठ्या प्रमाणात सुरू असून, यावरून विरोधक सातत्याने टीका करत आहेत. यातच आता काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करत थेट राज्यसभा खासदारकी मिळालेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.
राज्यात लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यांत होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी मतदान होणार आहे. भाजपाने उमेदवारी यादी जाहीर करण्यासोबतच स्टार प्रचारकांच्या नावाचीही घोषणा केली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाण यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण तयारीला लागले असून, सभा, बैठका यांवर भर दिला जात आहे. यातच एका सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर टीका करताना काँग्रेसला टोला लगावला आहे.
धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो
देशातील ८० ते ९० टक्के लोकांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर माझ्या मनातही दुसरे कोणी असण्याचे कारण नाही. त्यामुळे हा धाडसी निर्णय घेतला. भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचे? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाकडून त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. काँग्रेसमधून भाजपात आलेले अशोक चव्हाण काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी प्रचारसभा घेत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.