भाजपा खासदार हीना गावित अपघातात जखमी, दुचाकीस्वार महिलेला वाचवाताना कार दुभाजकावर आदळून झाला अपघात
By मनोज शेलार | Published: August 7, 2022 05:50 PM2022-08-07T17:50:36+5:302022-08-07T17:50:57+5:30
Heena Gavit: दुचाकीस्वार महिलेला वाचवितांना खासदार डॉ.हीना गावित यांचे चारचाकी वाहन दुभाजकाला धडकल्याने त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह तीनजण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी नंदुरबारात घडली.
- मनोज शेलार
नंदुरबार : दुचाकीस्वार महिलेला वाचवितांना खासदार डॉ.हीना गावित यांचे चारचाकी वाहन दुभाजकाला धडकल्याने त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह तीनजण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी नंदुरबारात घडली. खासदार गावित यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ.हीना गावित या आपल्या वाहनाने रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील एका कार्यक्रमाला जात असतांना हा अपघात घडला.
शहरातील करण चौफुली जवळ असलेल्या देवचंदनगर जवळील रस्त्याने त्या जात असतांना त्यांच्या वाहनासमोर अचानक दुचाकीस्वार महिला आली. चालकाने महिलेला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता वाहन दुभाजकावर जाऊन आदळले. त्यात खासदार गावित यांना हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली. महिला देखील जखमी झाली. स्वत: खासदारांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला रुग्णालयात पाठवत त्यांना धीर दिला. त्यानंतर खासदार व त्यांच्या सोबत असलेले रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुभाष पानपाटील हे स्वत: खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.