CAA च्या समर्थनार्थ भाजप खासदाराचे 360 ग्रामपंचायतींना आमंत्रण, प्रत्यक्षात पोहचले 250 गावकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:10 PM2020-01-04T16:10:28+5:302020-01-04T16:21:18+5:30
दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधूड़ी यांनी लोकांना एनआरसी व सीएए कायद्याची माहिती देण्यासाठी महापंचायतीचे आयोजन केले होते.
मुंबई: नागरिकत्व कायद्याला सर्वच ठिकाणी विरोध असताना दुसरीकडे मात्र भाजपकडून देशभरात एनआरसी व सीएए कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढल्या जात आहे. दक्षिणी दिल्लीत सुद्धा भाजपच्या खासदाराने एनआरसी व सीएए कायद्याची माहिती देण्यासाठी 360 गावांच्या ग्रामपंचायतींना बोलवून महापंचायतीचे आयोजन केले होते. मात्र लोकांनी या रॅलीकडे पाठ फिरवल्याने भाजपची नाचक्की झाली.
दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधूड़ी यांनी लोकांना एनआरसी व सीएए कायद्याची माहिती देण्यासाठी महापंचायतीचे आयोजन केले होते. ज्यात परिसरातील 360 ग्रामपंचायतींना निमंत्रण देण्यात आले होते. भाजपच्या अपेक्षेप्रमाणे हजारो लोकं या रॅलीसाठी येणार असल्याचा अंदाज होता. विशेष म्हणजे त्याप्रमाणे तयारी सुद्धा करण्यात आली होती.
मात्र 360 गावांच्या लोकांना महापंचायतीच्या कार्यक्रमाची माहिती देऊन सुद्धा गावकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली. तर या महापंचायतीत प्रत्यक्षात फक्त 250 लोकांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे खासदार बिधूड़ी यांनी एनआरसी व सीएए कायद्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या महापंचायतीच्या नियोजनाचा फज्जा उडल्याचा पाहायला मिळाले.