पुण्याची तुलना पंजाबशी नको, शहराचे नाव खराब होईल असे बोलू नका; मुरलीधर मोहोळांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:56 PM2024-06-29T22:56:01+5:302024-06-29T22:57:48+5:30
MP Murlidhar Mohol: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
MP Murlidhar Mohol: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर विविध घटनांमुळे चर्चेत आहे. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. पोर्शे कार अपघातानंतर एफसी रोडवरील अंमली पदार्थाचे प्रकरण समोर आले. यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक विनंती केली आहे. पुण्याची तुलना पंजाबशी करू नका, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
पुण्यातील घटनांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, विरोधासाठी विरोध नको. शहराचे नाव खराब होईल, असे कोणीही वक्तव्य करू नका, ही विनंती आहे. आम्हांला या शहरातील चुकीच्या घटना थांबवायच्या आहेत. दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही, असे आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
पुण्याची तुलना पंजाबशी नको
पुण्याची तुलना पंजाबशी नको. आम्ही सर्वांनी जातीने लक्ष घातले आहे. कारवाई होत आहे. याच्यावर १०० टक्के काम करू. या शहराची प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शहराचे नाव खराब होईल असे कोणीही वक्तव्य करू नये. भविष्यात असे होणार नाही, याची काळजी घेऊ, असे मोहोळ यांनी सांगितले. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अपघातावर बोलताना मोहोळ म्हणाले की, दुर्दैवी घटना आहे. त्या ठिकाणी गेलो होतो. पावसामुळे ही घटना घडली असल्याचे दिसून येत आहे. चौकशी समिती नेमण्यात आली आहे. जखमी आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
दरम्यान, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. एका नादुरुस्त विमानामुळे प्रवाशांना त्रास होत आहोत. त्याचा सर्वे होणार आहे, त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यास गती मिळणार आहे. टर्मिनल बांधून तयार आहे, पण संरक्षण खात्याचे मनुष्यबळ कमी होते. अमित शाह यांना भेटून याबाबत चर्चा केल्यानंतर आता मनुष्यबळ मिळाले आहे. नवीन टर्मिनल काही दिवसांत चालू होणार आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे. येत्या ८ दिवसांत नवीन टर्मिनल सुरू होईल, असे मोहोळ यांनी म्हटले आहे.