'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:02 PM2021-06-15T12:02:17+5:302021-06-15T12:36:50+5:30
नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता; पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार
नवी दिल्ली: शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं शरसंधान साधणाऱ्या नारायण राणेंना मोदी सरकारकडून स्पेशल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार असलेले नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. राणे त्यांच्या दिल्लीवारीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील.
शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेना भाजपपासून दूर गेली. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत मोदींच्या मंत्रिमंडळात होते. त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. हेच मंत्रालय राणेंना मिळण्याची शक्यता आहे. नवभारत टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सध्या या मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे २०१४ पासूनच अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे होतं. त्यावेळी अनंत गीते यांच्याकडे मंत्रालयाचा कार्यभार होता.
दोन आयाराम अन् एक निष्ठावान; मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' दिग्गजांना मिळणार स्थान?
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. नारायण राणे सातत्यानं ठाकरे सरकारवर शाब्दिक प्रहार करत आहेत. यासोबतच पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं आतापासूनच सर्व ताकद पणाला लावली आहे. राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.
अमित शहांचा दौरा फलदायी?
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात आले होते. त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. या भेटीत शहांनी राणेंच्या कामाचं आणि त्यांच्या कार्यशैलीचं अगदी तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपत आलेले राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सातत्यानं शाब्दिक हल्ले करतात. राणे आक्रमक नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे.