ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:31 AM2019-11-18T11:31:19+5:302019-11-18T11:31:37+5:30
1995 ला सुद्धा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले होते.
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेना-भाजप युतीचे सूत्र घालून दिलं होतं. त्याच सूत्राप्रमाणे शिवसेनेने जावं आणि जनमताचा आदर करावा अशी आमची इच्छा आहे. असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं. रविवारी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेने एकत्र निवडणूक लढली होती. भाजप शिवसेनेने महाजनादेश यात्रा काढल्यानंतर आमच्या आघाडीला जनतेने बहुमत दिलं. या बहुमताचा आदर दोन्ही पक्षांनी केला पाहिजे. त्यामुळे ज्याचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री जे सूत्र बाळासाहेबांनी आणि महाजनांनी घालून दिले होते, त्याच सूत्राने भाजप-शिवसनेने जावे. असे दानवे यावेळी म्हणाले.
भाजप शिवसेना युतीचे जनक बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन आहेत. 1995 ला सुद्धा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले होते. त्यावेळी शिवसेनेकडून मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि भाजपचा उपमुख्यमंत्री झाला. असेही दानवे यावेळी म्हणाले.
तर विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. हे उद्धव ठाकरे यांनीच पत्रकार परिषदेत मान्य केलं. तर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चांगला कारभार झाला आहे. त्यामुळे नेतृत्व बदलायचं काही कारण उद्भवत नाही. असेही दानवे म्हणाले.