भाजपा खासदाराची पंकजा मुंडेंवर आगपाखड; पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 12:30 PM2019-12-13T12:30:28+5:302019-12-13T12:42:04+5:30
त्याचसोबत पंकजा मुंडे यांच्याकडे गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. पक्षाने निर्णय घ्यावा असं सांगता, माझ्या बापाचा पक्ष आहे असं बोलता मग बापाने कारवाई करावी असं वाटतं का?
पुणे - पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि पक्ष सोडून कार्यक्रम ठेवावा एकही नेता येणार नाही. पंकजा मुंडे यांनी मुंडे कुटुंबांचे अस्तित्व जपावं, पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय? मतदारसंघातील लोकांनी तुम्हाला मतदान केले नाही, चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून पुण्यात येऊन निवडून आले. तुम्हाला मतदारसंघ सांभाळता आला नाही, बाहेरचे लोकांनी येऊन मतदान केलं आहे का? असा सवाल भाजपा खासदार संजय काकडे यांनी केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना संजय काकडे म्हणाले की, पंकजा मुंडे यांना एवढी पदं देऊन ३० हजारांच्यावर मतांनी पराभूत झाल्या. त्यांच्या मेळाव्याला पक्षाला काही हानीकारक होईल असं वाटत नाही. वैयक्तिक समाधान देणाऱ्या या गोष्टी आहे. ज्यांना स्वत:चं घर, मुठभर मतदारसंघ सांभाळता येत नाही, घरात एक खासदार, मंत्री असताना पराभूत होतात. गोपीनाथ मुंडे यांचे वलय असताना पराभवाला सामोरं जावं लागतं. पराभव पचविता येत नाही. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच भाजपापासून ओबीसी समाज दुरावेल असं वाटत नाही, ५० पेक्षा अधिक भाजपा आमदार ओबीसी समाजाचे आहे. पंकजा मुंडे यांचे काल जातीपातीचं राजकारण केलं. ५ वर्ष सत्तेत असून मराठवाड्याच्या दुष्काळासाठी काय केलं? गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले नेते ५ वर्षात पंकजा मुंडे यांच्या कोणत्या व्यासपीठावर दिसले. गेल्या ५ वर्षात कोणत्या समाजातील कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहे? असा घणाघातही संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला.
त्याचसोबत पंकजा मुंडे यांच्याकडे गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. पक्षाने निर्णय घ्यावा असं सांगता, माझ्या बापाचा पक्ष आहे असं बोलता मग बापाने कारवाई करावी असं वाटतं का? गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी खूप केलं त्यांना पक्षानेही तेवढाच सन्मान दिला. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वेगळा ड्रामा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मुठभर लोकांना घेऊन अशाप्रकारे व्यासपीठावर भाषणं केली अशी टीकाही काकडेंनी केली.
दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही, मी जर काल गोपीनाथ मुंडे गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. संवादाने खूप गोष्टी सुटतात. मतभेद असतात, बंड केलेल्यांची उदाहरण सांगितलं बंड स्वकीयांविरोधात करायचं नसतं. आपल्या माणसांविरोधात भांडायचं नसतं चर्चा करायची असते. केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल असा सूचक इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपातील नाराज नेत्यांना दिला आहे.