“महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस जेवणापुरते वऱ्हाडी”: सुजय विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 03:00 PM2022-03-27T15:00:18+5:302022-03-27T15:01:01+5:30
नवीन कामे करण्यापेक्षा केंद्राच्या कामांचे श्रेय घेण्याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
नगर: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकारने आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षही टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर या निर्णयावरून महाविकास आघाडीतही मतभेद आहेत. महाविकास आघाडीतील नेतेच या निर्णयावरून एकमेकांवर टीका करत आहेत. यातच आता भाजप खासदारांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचे सांगत महाविकास आघाडीला नवरा-बायको आणि वऱ्हाडींची उपमा सुजय विखे पाटील यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अधिवेशनाच्या काळात विरोधपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी
महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी आहेत. नवऱ्याने दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे, तर कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही, असा खोचक टोला सुजय विखे-पाटील यांनी लगावला आहे. तसेच एक सक्षम आणि अभ्यासू विरोधीपक्ष म्हणून फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा राहिला. मागील सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. दुर्दैवाने त्यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. उलट जिल्ह्यातील काही नेत्यांनी विरोधच जास्त केला. त्यामुळेच तर काँग्रेस सोडण्याची वेळ आमच्यावर आली, असे सुजय विखे-पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही
महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यांचे प्रत्येक निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. त्यांना गरिबांचे हित कशात आहे, हे कळत नाही. त्याचे देणेघेणेही नाही. ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णयही असाच आहे. या निर्णयावर काय बोलावे, हेच कळत नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना याचे उत्तर देईल. नवीन कामे करण्यापेक्षा केंद्र सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे. केंद्र सरकारच्या योजना राबविताना अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष वापरल्याचं दिसून येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतूक करण्याचे किमान त्याचे श्रेय त्यांना देण्याचे औदार्यही या लोकांना दाखविता येत नाही, या शब्दांत सुजय विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.