“आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल”; भाजप नेत्याने लगावला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 05:19 PM2024-02-23T17:19:47+5:302024-02-23T17:21:19+5:30
BJP MP Sujay Vikhe Patil: केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेल्या तुतारी चिन्हावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
BJP MP Sujay Vikhe Patil:राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह शरद पवार गटाला बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाने या चिन्हाचे स्वागत केले असून, विरोधक मात्र शरद पवार गटावर टीका करताना दिसत आहेत.
आता अवघा देश होणार दंग, खासदार शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकले जाणार विकासाचे रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे, असे शरद पवार गटाने जाहीर केले आहे. यानंतर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिलेल्या तुतारी चिन्हावरून टोला लगावला आहे.
आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल
मशाली घ्या तुतारी वाजवा. हवे तर त्यांना नव्या तुतारी घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल, असा टोला लगावत, चिन्ह देणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेले आहे पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले गेले आहे. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यंत बॅलेटवर चिन्ह येत नाही, तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष' हे नाव शरद पवार गटाला दिले होते. त्यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे.