महाविकास आघाडीचा दणका; खासदार उदयनराजे भोसलेंना जोरदार धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:39 PM2021-04-01T15:39:05+5:302021-04-01T15:43:52+5:30
bjp mp udayan raje bhosale close aid loose toll contract: भाजप खासदार उदयनराजे भोसलेंना महाविकास आघाडीचा धक्का
सातारा: सातारा-कोल्हापूर महामार्गावरील साताऱ्यातील आणेवाडी आणि पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यांचं अशोक स्थापत्य कंपनीला दिलेलं कंत्राट काढून घेण्यात आलं आहे. ही कंपनी भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या निकटवर्तीयांची आहे. अशोक स्थापत्यकडून काढून घेण्यात आलेलं कंत्राट पुण्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. हा निर्णय छत्रपती उदयनराजे भोसलेंना राजकीय धक्का मानला जात आहे.
“साहेब, आता मुख्यमंत्री होतायेत, काळजी नाही”; शिवसेना नेत्याची छत्रपती उदयनराजेंना गळाभेट
अशोक स्थापत्य कंपनी उदयनराजे भोसलेंचे समर्थक असलेल्या अशोक सावंत यांची आहे. ३ एप्रिलला हे व्यवस्थापन बदललं जाणार आहे. त्यामुळे टोलनाक्यांवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा ते पुणे मार्गावरील २ टोलनाक्यांचं व्यवस्थापन येत्या ३ एप्रिलपासून बदललं जाणार आहे. यात साताऱ्यातील आणेवाडी आणि पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यांचा समावेश आहे. या दोन्ही टोलनाक्यांचं व्यवस्थापन सध्याच्या घडीला अशोक स्थापत्य कंपनीकडे आहे.
"लोक एकमेकांशी बोलायचे बंद झालेत; प्रत्येक ठिकाणी राजकारण करु नका"
दोन राजांमध्ये संघर्ष; उदयनराजेंची सरशी
आणेवाडी टोलनाक्याच्या कंत्राटावरून बरंच राजकारण घडलं आहे. या टोलनाक्याचं व्यवस्थापन आपल्याकडे राहावं यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थक नगरसेवकानं बराच जोर लावला होता. त्यामुळे उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र या टोलनाक्याचं कंत्राट उदयनराजेंचे समर्थक असलेल्या अशोक सावंत यांच्याकडेच राहिलं.
आता या टोलनाक्यांवरील व्यवस्थापन बदलण्यासाठी हालचाली वेगानं सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून टोलनाक्यांवरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोव्ही टोलनाक्यांचं व्यवस्थापन अशोक सावंत यांच्याकडून काढून घेऊन ते पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके आणि शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारनं उदयनराजे भोसलेंना शह दिल्याची चर्चा सुरू आहे.