Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? उदयनराजेंने सूचक विधान; म्हणाले, “काही तांत्रिक अडचणी...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 01:53 PM2022-07-23T13:53:32+5:302022-07-23T13:54:46+5:30
Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आता पुढील आठवड्यातच राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. पुढील तीन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मुंबई बाहेरचे व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता, आता पुढच्या आठवड्यातच विस्तार होण्याची चिन्हे आहेत. मात्र, यातच आता भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया नोंदवताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लटकल्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही लांबणीवर पडले आहे. २५ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. विस्तार झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना खात्याची माहिती घेण्यासाठी किमान एक आठवड्याचा कालावधी लागेल. त्यामुळे नव्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यांची पूर्ण माहिती घ्यावी लागणार आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी नेमका कधी होणार याकडे लागले आहे. यातच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे उदयनराजे म्हणाले.
येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल
प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी, हे सरकार लवकरच पडेल, या विरोधकांच्या आरोपाबाबत विचारले असता, शिंदे-फडणवीस सरकारला दृष्ट लागू नये म्हणून ते बोलतात. पण हे सरकार पडणार नाही. त्यामुळे काहीही काळजी करू नये, असे सांगत येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. पण निश्चितपणे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सध्या राष्ट्रपतीची निवडणूक झाली आहे, सोमवारी त्यांचा शपथविधी होणार आहे. मूर्मू यांचा शपथविधी झाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा विश्वास उदयनराजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित समारंभ व स्नेहभोजनाला दोघेही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी ते विस्ताराबाबत चर्चा करतील, असे म्हटले जात होते. मात्र, अशी कोणतीही भेट ठरली नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसाची बैठक पनवेल येथे होणार आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते तेथे असतील. २४ जुलै रोजी भाजप व मित्रपक्षांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक गृह मंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बोलविली आहे. त्या बैठकीला शिंदे-फडणवीस हे दोघेही उपस्थित राहतील.