भाजपा खासदारांकडून लातूरच्या दुष्काळाची पाहणी सुरु

By admin | Published: May 15, 2016 03:23 PM2016-05-15T15:23:03+5:302016-05-15T15:23:03+5:30

दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या लातूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह १३ खासदार रविवारी सकाळी ग्रामीण भागात दाखल झाले आहेत़

BJP MPs begin inspection of Latur drought | भाजपा खासदारांकडून लातूरच्या दुष्काळाची पाहणी सुरु

भाजपा खासदारांकडून लातूरच्या दुष्काळाची पाहणी सुरु

Next

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १५ : दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या लातूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह १३ खासदार रविवारी सकाळी ग्रामीण भागात दाखल झाले आहेत़ जलयुक्त शिवार कामाची पाहणी करण्याबरोबरच दुष्काळी अनुदानासह अन्य विविध शासकीय योजना गोरगरीबांपर्यंत पोहत आहेत की नाही, याची माहिती नागरिकांशी संवाद साधून खासदार मंडळी घेत आहेत़
मराठवाड्यातील लातुरात यंदा दुष्काळामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे़ दोन महिन्यांपूर्वीच राज्याच्या मंत्रीमंडळाने तालुक्यांचा दौरा करुन पाहणी केली होती़ आता केंद्र सरकारमध्ये सदस्य असलेले भाजपाचे खासदार लातूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी आले आहेत़
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी सकाळी लातूर शहरातील आरेफ सिद्दीकी यांच्या घरी जलपुर्नभरणाच्या कामाचे उद्घाटन करुन शहरवासियांशी संवाद साधत शहरातील पाणीटंचाईची माहिती घेतली़
जळकोट तालुक्यातील जगळपूर, उमरगा रेतू येथील जलयुक्तच्या कामाची खासदार कपिल पाटील यांनी पाहणी केली आहे़ चारा- पाण्याचा प्रश्न सोडवा, टँकरच्या फेऱ्या वाढवा अशी मागणी नागरिकांनी केली असता त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील़ तसेच विकास कामासाठी राज्यसभेच्या खासदारांना निधी देण्यास सांगून असे आश्वासन खा़ कपिल पाटील यांनी दिले़
खासदार सुभाष भामरे यांनी औसा तालुक्यातील बुधोडा, खुंटेगाव येथील नाला खोलीकरणाची पाहणी केली़ सेलू येथील गावकऱ्यांशी संवाद झाला़ किणीथोट येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी शेती आणि ग्रामपंचायतीसंदर्भात विविध समस्या मांडून ग्रामसेवक व कृषी सहाय्यकास निलंबित करण्याची मागणी केली़ तेव्हा आपल्या समस्या सोडविण्यात येतील, असे खा़ भामरे यांनी सांगितले़ दरम्यान, खा़ सुनील गायकवाड यांनी औसा तालुक्यातील भाद्याच्या पाणीटंचाईची पाहणी केली आणि शिवली येथील चारा छावणीस भेट दिली़


देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथे खासदार ए़ टी़ पाटील यांच्या हस्ते नाला सरळीकरणाच्या कामाचे उद्घाटन झाले़ धनेगाव बॅरेजेसची पहाणी करुन तेथील आणि नेकनाळ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला़ धनगरवाडीतील नागरिकांच्या तक्रारी ऐकून खा़ पाटील हे तलाठ्यावर भडकले होते़ शेतकरी फाटका समजू नका, तो राजा आहे, असे अधिकाऱ्यांना बजावले़
उदगीर तालुक्यातील लोहारा येथील जलयुक्तच्या कामाची पाहणी खासदार अशोक नेते यांनी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला़ त्यानंतर त्यांनी उदगीर शहरातील पाणीटंचाईसंदर्भात नागरिकांशी संवाद साधला़
खासदार नानासाहेब पटोले यांनी निलंगा तालुक्यातील हलगरा, औराद येथील तरेणा नदीच्या जलयुक्तच्या कामाची पाहणी केली़ तेरणा नदीवर जलकुंभ करण्याची मागणी हलगरा गावकऱ्यांनी त्यांच्याकडे केली़
चाकूर तालुक्यातील गांजूरवाडी, आष्टा, जानवळ, म्हाळंगी येथील समस्यांची पाहणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी करुन नागरिकांशी संवाद साधला़


खासदार प्रीतम मुंडे यांनी रेणापूर तालुक्यातील खरोळा, आनंदवाडी, पानगाव येथे कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या़ दुष्काळी अनुदान, रस्ता, पाणीटंचाई अशा समस्या नागरिकांनी मांडल्या़ तेव्हा या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे खा़ प्रितम मुंडे म्हणाल्या़
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील नाला सरळीकरणाचे उद्घाटन खासदार दिलीप गांधी यांनी केले़ तळेगाव येथील शोषखड्याची पाहणीही केली़ केंद्रीयमंत्री हंसराज अहीर हे अहमदपूर तालुक्याची पाहणी करण्यासाठी दुपारी १२़४५ वा़ आले असून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत़ उदगीर तालुक्यातील गुडसूर येथे खासदार शरद बनसोडे हे दुपारी १़४० वा़ दाखल होऊन नागरिकांशी संवाद साधला़ गावकऱ्यांनी पाण्याचा प्रश्न मांडला़
सरकारकडून काम करुन घेऊ़़़
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडविण्यासाठी राज्य सरकारला सांगून नव्हे तर करुन घेऊ, असे आश्वासन खासदार चिंतामण वणगा यांनी दिले़ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जेवळी येथील मांजरा नदीच्या खोलीकरणाची पाहणी चिंतामण वणगा यांनी केली़ तसेच काटगाव, कासारजवळा, वांजरखेडा, तांदुळजा येथील परिस्थितीची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला़

 

Web Title: BJP MPs begin inspection of Latur drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.