भाजपा खासदारांचे दुष्काळी पर्यटन

By Admin | Published: May 16, 2016 02:07 AM2016-05-16T02:07:10+5:302016-05-16T02:07:10+5:30

लातूर जिल्ह्याची पाहणी करण्याच्या नावाखाली भाजपा खासदारांनी रविवारी दुष्काळी पर्यटन केल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू होती

BJP MPs drought tourism | भाजपा खासदारांचे दुष्काळी पर्यटन

भाजपा खासदारांचे दुष्काळी पर्यटन

googlenewsNext

लातूर : दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या लातूर जिल्ह्याची पाहणी करण्याच्या नावाखाली भाजपा खासदारांनी रविवारी दुष्काळी पर्यटन केल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू होती. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी ‘शेतकऱ्यांनो, आपले मनोधैर्य खचू देऊ नका, हिमतीने सामना करा,’
असे तोंडदेखले आवाहन या खासदारांनी केले़
मराठवाड्यातील लातुरात यंदा दुष्काळामुळे मोठे संकट निर्माण झाल्याने प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे १३ खासदार ग्रामीण भागाच्या पाहणीसाठी दाखल झाले होते़ जलयुक्त शिवार कामाची पाहणी करण्याबरोबरच दुष्काळी अनुदानासह विविध शासकीय योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचत आहेत की नाही, याची माहिती त्यांनी नागरिकांशी संवाद साधून घेतली़ दानवे यांनी नागझरी, हरंगुळ बु़ येथील जलयुक्तच्या कामाची पाहणी केली़ तर, काटगाव, कासारजवळ, वांजरखेडा, तांदुळजा येथील परिस्थितीची पाहणी खा़ चिंतामण वणगा यांनी केली़
खा. सुभाष भामरे यांनी औसा तालुक्यातील बुधोडा, खुंटेगाव, सेलू, जावळी, मोगरगा येथील नाला खोलीकरणाची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला. किल्लारीच्या शेततळ्याची व तेरणा नदीवरील बॅरेजेसची पाहणी केली़ खा. नानासाहेब पटोले यांनी निलंगा तालुक्यातील हलगरा, औराद येथील तरेणा नदीच्या जलयुक्तच्या कामाची पाहणी केली़ तेरणा नदीवर जलकुंभ करण्याची मागणी हलगरा गावकऱ्यांनी त्यांच्याकडे केली; पण ठोस आश्वासन मिळाले नाही.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, तळेगाव दे़ कानेगाव, येरोळ, तिपराळ या गावांची खासदार दिलीप गांधी यांनी पाहणी केली़ वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्येने हैराण झालेल्या नागरिकांनी त्यांच्याकडे गऱ्हाणे मांडले़ तेव्हा महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारावा, अशा सूचना त्यांनी तहसीलदारांना केल्या़ एकूणच या पाहणीदौऱ्यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच
लागले नाही.

Web Title: BJP MPs drought tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.