भाजपा आमदाराचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 08:50 PM2017-09-08T20:50:38+5:302017-09-08T20:50:59+5:30
जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी कंत्राटदाराला केलेल्या मोबाईल कॉलची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. आमदाराने पैसे मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. दरम्यान आमदाराचे हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याची तयारी कंत्राटदार संघटनेने चालविली आहे.
यवतमाळ, दि. 8 - जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी कंत्राटदाराला केलेल्या मोबाईल कॉलची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. आमदाराने पैसे मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. दरम्यान आमदाराचे हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याची तयारी कंत्राटदार संघटनेने चालविली आहे. त्या अनुषंगाने शनिवारी जिल्हा कंत्राटदार संघटनेची बैठक बोलविण्यात आली आहे.
आर्णी मतदारसंघातील बांधकामांबाबत आमदार तोडसाम यांनी कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांना मोबाईलवर संपर्क केला. या संभाषणाची आॅडिओ क्लिप गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. आमदारांनी पैसे मागितले, ते न दिल्यास गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत केलेल्या कामांची चौकशी करण्याची धमकी दिली, पुन्हा मतदारसंघात कामे करू नका, असे बजावले आदी आरोप कंत्राटदाराने केले आहे. गुरुवारी सायंकाळी शर्मा यांनी पोलीस ठाण्यात अर्जही दिला होता.
नागपुरात आमदाराचा निषेध
दरम्यान जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद वाढोणकर यांनी लोकमतला सांगितले की, नागपूर येथे कंत्राटदारांचे विदर्भस्तरीय आंदोलन झाले. त्यात आमदार तोडसाम यांचा निषेध करण्यात आला. हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडले जाणार आहे. शनिवारी जिल्हा कंत्राटदार संघटनेची बैठक होत आहे. त्यात चर्चा करून व कायदेशीर सल्ला घेऊन रितसर तक्रारी केल्या जाणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात लोकप्रतिनिधींना कलंकित करणारी ही पहिली घटना आहे. कंत्राटदार शर्मा यांनी मुलगा आजारी असल्याचे सांगितल्यानंतरही आमदार ऐकत नाही, यावरुन त्यांच्यासाठी पैसाच सर्व काही असल्याचे स्पष्ट होते. या आमदाराविरोधात आंदोलन उभारणार असल्याचे वाढोणकर यांनी सांगितले.
पोलीस म्हणतात, तक्रारच नाही
वडगाव रोडचे ठाणेदार बाळासाहेब खाडे म्हणाले, कंत्राटदार शर्मा यांनी गुरुवारी रितसर तक्रार नव्हे तर केवळ पोलिसांच्या माहितीसाठी अर्ज दिला होता. त्यांचा जाब-जबाब नोंदविला गेला. तेव्हा त्यांनी हा केवळ माहितीस्तव अर्ज असल्याचे सांगितल्याने त्यावर चौकशी किंवा गुन्हा दाखल केला गेला नाही.
आमदार खोट बोलत आहेत
कंत्राटदार शिवदत्त शर्मा म्हणाले, आमदार तोडसाम यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रकरण अंगाशी आल्याचे पाहून आमदार खोटे बोलत आहे. त्यांनी बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे. ते जर निकृष्ट असते तर देयके कशी मंजूर झाली असती, असा सवाल शर्मा यांनी केला. या कामासंबंधी गुणवत्ता नियंत्रण विभागाचा अहवालही असल्याचे सांगण्यात आले. कंत्राटदार संघटनेच्या निर्देशावरून पुढील कारवाई करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
कुणाची तरी चाल असावी
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे म्हणाले, आमदार तोडसाम यांनी कंत्राटदार शर्मा यांना फोन केला, हे वास्तव आहे. मात्र संपूर्ण कॉल रेकॉर्ड केला गेल्याने ही कुणाची तरी चाल असावी, अशी शंका येते. आपण तोडसाम यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यांनी फोनवर बोलण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून वास्तव सांगतो, असे म्हटले. आॅडिओ क्लिपमध्ये पैशाची मागणी दिसत नाही. आमदाराच्या प्रत्यक्ष भेटीनंतरच नेमके काय ते पुढे येईल. मात्र जे झाले ते चांगले नाही, अशी प्रतिक्रिया डांगे यांनी नोंदविली.