भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका; पंकजा मुंडेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 03:31 PM2019-12-12T15:31:56+5:302019-12-12T15:39:34+5:30
पक्षांतरांच्या चर्चेला पंकजा मुंडेंकडून पूर्णविराम; राज्यातील पक्ष नेतृत्त्वावर हल्लाबोल
बीड: भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे. तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे. पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून काहीशा दूर गेल्याचं चित्र दिसत होतं. त्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येनं गोपीनाथ गडावर जमण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
भाजपा हा माझा पक्ष आहे. काही जण म्हणतात बापाचं घर, बापाची जमीन, तसा हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असं म्हणत मुंडेंनी आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडेंच्या कामाची आठवण करुन देत त्यांनी भाजपातील राज्यातील नेतृत्त्वावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष करून मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. तो पक्ष आपण रिव्हर्स गिअरमध्ये नेऊ नये एवढीच विनंती. मला तो पक्ष परत पाहिजे, असं पंकजा म्हणाल्या.
पक्ष ही प्रक्रिया असते. त्यावर कुणाचीही मालकी नसते. पक्ष एका व्यक्तीचा नाही. अटल बिहारी वाजपेयी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शहा यांच्यासारख्यांनी भाजपाचं अध्यक्षपद भूषवलं आहे. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. गोपीनाथ मुंडेंच्या रक्तात बेईमानी नाही, असं म्हणत त्यांनी पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
गोपीनाथ गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं आवाहन केलं. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतंही पद मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न करतंय का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं पंकजा म्हणाल्या. पद मिळवण्यासाठी मी दबावतंत्र वापरते. पदाच्या हव्यासापोटी असे आरोप होत असतील, तर मला कोअर कमिटीतून मुक्त करा. लोकशाही मार्गानं तिथं (कोअर कमिटीत) काही होत नसेल, तर त्या ठिकाणी राहण्यात अर्थ काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.