Narayan Rane: पैसा खाणे शिवसेनेचा धर्म, शिवसैनिकांना दमडी तरी मिळाली का?; नारायण राणेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:54 PM2022-04-08T17:54:10+5:302022-04-08T17:54:42+5:30
तुमच्या काळ्या पैशाचा शिवसैनिकांचा संबंध कसा आला? कोट्यवधीचे घोटाळे तुम्ही करणार त्यातील शिवसैनिकांना एक दमडी तरी मिळाली का? असा सवाल नारायण राणेंनी केला.
मुंबई – महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांच्या(Yashwant Jadhav) डायरीत कुणाकुणाची नावे आहेत. स्थायी समिती अध्यक्षांनी जे पैसे खाल्ले ते मुंबईच्या जनतेने जो कर भरला आहे. त्यातून १५ टक्के कंत्राटातून काढले ते आहेत. मुंबईकरांच्या मेहनतीचा पैसा यशवंत जाधवांनी खाल्ला. यावर कुणीच बोलत नाही. पक्षप्रमुख पण नाही आणि शिवसेनाही नाही. बेकायदेशीरपणे केलेल्या कामाचं समर्थन शिवसेना कसं करते हे लोकं पाहत आहेत. पैसा खाणे हा शिवसेनेचा धर्म आहे असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेवर केला.
नारायण राणे(Narayan Rane) पत्रकार परिषदेत म्हणाले की, ईडीची धाड पडली तर तो पैसा कुठून आला त्याची माहिती दे. अधिकाऱ्यांकडे खुलासा कर. वकील घेऊन जा, पण सूडाची कारवाई वैगेरे बोलत बसलात. पीएमएलए कायदा त्यासाठीच आहे. शिवसेना कुणाला घाबरणार नाही. तुमच्या काळ्या पैशाचा शिवसैनिकांचा संबंध कसा आला? कोट्यवधीचे घोटाळे तुम्ही करणार त्यातील शिवसैनिकांना एक दमडी तरी मिळाली का? एका जाधवांकडे इतका कोट्यवधीचा पैसा मिळाला तर बाकींच्याकडे किती असतील? महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नावं सीबीआयकडे देणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कोरोनाकाळात अनेक शिवसैनिक गेले. त्यांचे घरसंसार उघड्यावर पडले. मुख्यमंत्री एकाच्या तरी घरी गेले का? रमेश मोरेला कोणी मारलं? पोलीस कर्तबगार आहे. तुमच्याकडे सरकार आहे. चौकशी करा. शिवसेना वाढण्यासाठी दिवसरात्र घालवली त्यांच्यासाठी पक्षाने काय केले. लोकप्रभामध्ये असताना ठाकरे कुटुंबावर कपडे उतरवण्याची भाषा संजय राऊतांनीच केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आहे की संजय राऊत हा लोकांना प्रश्न पडला आहे असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
बिनमुख्यमंत्र्यांचं राज्य
महाविकास आघाडी सरकारमध्ये महसुली तूट २४ हजार कोटींची आहे. अर्थसंकल्पात केवळ हे देऊ, ते देऊ अशी बनवाबनवी केली. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. या राज्याला मुख्यमंत्री नाही. बिनमुख्यमंत्र्यांचे राज्य आहे. मंत्रालयात कुणी नाही. कॅबिनेटला नाही. सभागृहात तोंड दाखवायचं आणि जायचं. अंतिम आठवडा प्रस्तावात सभागृहात राजकीय भाषण केले. वैचारिक विचार काहीच दिला नाही. राज्याच्या जनतेला काय उत्तर दिले. भाषणात टोमणेच दिले असंही नारायण राणे म्हणाले.