“लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल”: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 16:30 IST2024-04-24T16:28:59+5:302024-04-24T16:30:21+5:30
BJP Narayan Rane News: या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही खासदार येणार नाही. लोकसभा निवडणूक झाली की १६ पैकी दहा आमदार शिंदे गटात जातील, असा दावा नारायण राणेंनी केला.

“लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल”: नारायण राणे
BJP Narayan Rane News:रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. अखेर अनेक चर्चांनंतर या जागेवर भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर नारायण राणे यांनी प्रचाराचा धडका लावला आहे. एका प्रचारसभेत बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही खासदार येणार नाही. लोकसभा निवडणूक झाली की १६ पैकी दहा आमदार शिंदे गटात जातील. मग सहा राहतील. त्यापैकी किती येतील हे माहिती नाही. पुढच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल, कारण निवडणुकीनंतर आमदार खासदार कोणहीही राहणार नाही, या शब्दांत नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले. आम्ही भारतीय संविधान बदलणार नाही यातून आमच्याविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच बाबासाहेबांच्या अनुयायांना भडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
पुन्हा निवडून आलो तर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळेल
आता दिल्लीत कॅबिनेट मंत्री आहे आणि पुन्हा निवडून आलो तर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. पण यांना काय मिळणार? या निवडणुकीत आमचे खासदार ४०० पर्यंत जाणार आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, मग दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार? कोकणात पूर येतो, दहा वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, असा कोणता प्रश्न विनायक राऊत यांनी सोडवला नाही, या शब्दांत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, माझ्याएवढा राजकारणात नशीबवान कोणी नाही. अनेक लोकांना मी भेटत आहे. लोक मला एकच सांगत आहेत की, यावेळी तुम्हाला मतदान करायला मिळणार, हे आमचे नशीब आहे. असे उद्गार लोकांचे मला ऐकायला मिळत आहेत. १० वर्षांत मोदी यांनी भारताला अर्थव्यवस्थेत ५ व्या क्रमांकावर आणले. आमच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करू शकले नाहीत. कोणत्याही विषयात आमचे पंतप्रधान कमी पडत नाही प्रत्येक विषयावर त्यांची कमांड आहे गरिबांविषयी आस्था आहे, असे नारायण राणे म्हणाले.