Narayan Rane: “बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 08:38 PM2022-04-18T20:38:29+5:302022-04-18T20:39:52+5:30
Narayan Rane: भाजप-मनसे युतीबाबत सूचक विधान करताना, राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका येईल असे काही नाही, असे नारायण राणे म्हणाले.
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या ठाम भूमिकेवरून आता शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बाळासाहेब ठाकरे यांनी भोंग्यांबाबत जी भूमिका घेतली होती, तीच आता राज ठाकरे पुढे नेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेकविध बाबतीत तुलना केली जाते. मात्र, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज ठाकरे यांची तुलना बाळासाहेब ठाकरेंशी करण्यास नकार दिला असून, बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा असल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल ट्वीट केले असून, त्यांचे समर्थन केले आहे. भोंग्याला विरोध नाही, पण बेकायदेशीर भोंग्यांबद्दल ते बोलले आहेत. मग ते अनधिकृत भोंगे का ठेवावेत?, असा सवाल करत मनसे आणि भाजपची ताकद एकत्र आली तर ताकद वाढेल. पण भाजपा एकटी तिन्ही पक्षांना सामोरं जाण्यासाठी समर्थ आहे. राज ठाकरे यांच्या हिंदुत्वावर शंका येईल असे काही नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारला पावले उचलावी लागतील
राज ठाकरे कायदेशीर बोलले असून राज्य सरकारला पावले उचलावी लागतील. कायद्याचे राज्य आहे असे दाखवण्यासाठी अधिकारी दोन तीन ठिकाणी कारवाई करतील. पण भोंगे काढल्यानंतर जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ती परिस्थिती हाताळण्याची क्षमता महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले. राज्य दिवाळखोरीच्या दिशेने जात असून, विकासाच्या बाबतीत १० वर्ष मागे गेले आहे. राज्याची आर्थिक स्थिती दयनीय आहे. विकास करण्यासाठी पैसे नाहीत, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
राज ठाकरेंची बाळासाहेबांशी तुलना करु शकत नाही
राज ठाकरे यांची तुलना बाळासाहेबांशी करु शकत नाही. बाळासाहेबांची तुलना कोणाशीही करु इच्छित नाही. बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा पेटता निखारा होता. त्यांनी कधीच तडजोडी केल्या नाहीत, सौदेबाजी केली नाही. सत्तेसाठी किंवा पैशासाठी हिंदुत्वाशी गद्दारीचा विचारही डोक्यात आला नाही. आतासारखे नाही. एक मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी पक्षाला सोडले. बाळासाहेबांनी कधीही विचार केला नव्हता, असे नारायण राणे यांनी स्पष्टपणे सांगितले. हिंदू धर्माबद्दल इतके असते तर हे राष्ट्रवादीसोबत दिसले नसते. पिकनिक काढत आहेत. हा देखावा आहे. हे हिंदूप्रेम बेगडी, स्वार्थी आहे. बाळासाहेबांना धर्माबद्दल जो गर्व होता त्यातील एक टक्काही यांच्यात नाही, अशी टीका शिवसेनेवर केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, आम्ही रडी गेम खेळत नाही. आम्ही मैदानात लढणारे आहोत. तेव्हा आम्ही होतो म्हणून शिवसेना इथपर्यंत आली. पण आता सैनिकांना पदाधिकाऱ्यांना कोण विचारत आहे? मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आंदोलने केली. पण दोन वर्षात किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, उपक्रम रावबले. या सरकारकडून अपेक्षा नाही, या शब्दांत नारायण राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला.