Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंची शिवसेना डुप्लिकेट, दसरा मेळाव्याचा खरा अधिकार शिंदे गटालाच”: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 08:15 PM2022-09-17T20:15:54+5:302022-09-17T20:16:44+5:30
Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन ठाकरे सरकारने केवळ छापाछापी केल्याचा आरोप नारायण राणेंनी केला.
Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही तीव्र होताना पाहायला मिळत आहे. यातच आता पुन्हा एकदा दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी यात उडी घेतली असून, शिंदे गटालाच दसरा मेळावा घेण्याचा खरा अधिकार आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेला महापालिका का मैदान देत नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, खरी शिवसेना असलेल्या शिंदे गटालाच दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही डुप्लिकेट असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. मेळाव्यासाठी मैदान कुणाला हा महापालिका निर्णय घेईल. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारने केवळ छापाछापी केल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना नाही, ती डु्प्लिकेट आहे, अशी बोचरी टीका राणे यांनी केली.
शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडूनही महापालिकेकडे अर्ज
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हेच मैदान मिळावे यासाठी शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडूनही महापालिकेकडे अर्ज केला गेला आहे. आता निर्णय घ्यावाच लागणार असल्याने महापालिकेनेही हालचाली सुरु केल्या आहेत. विधी विभागाने अर्जाची पाहणी केली असून, परवानगीबाबत कायदेशीर बाजू तपासली जात आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी शिवाजी पार्कवरही दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात शिवसैनिकांना आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेश दिले आहेत.