BJP on Nawab Malik: 'नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी', भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 02:51 PM2022-03-01T14:51:02+5:302022-03-01T14:51:09+5:30

'महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणाऱ्या नवाब मलिकची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे'

BJP | Nawab Malik | government should be expelled Nawab Malik from the cabinet, demand of BJP | BJP on Nawab Malik: 'नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी', भाजपची मागणी

BJP on Nawab Malik: 'नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी', भाजपची मागणी

Next

ठाणे : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रांतून स्पष्ट होत असतानाही संपूर्ण ठाकरे सरकार त्या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी खेळत असून दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे. सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि दाऊदचा हस्तक नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी व आमदार निरंजन डावखरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरविणाऱ्या नवाब मलिक याचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला असून तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडविले होते. या कटाच्या अंमलबजावणीकरिता स्थानिक पातळीवर पैसा उभा करण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घेण्यात आल्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र आता उघडकीस येऊ लागले आहे.

नवाब मलिकने केलेला व्यवहार हा त्या षडयंत्राचाच एक भाग होता, हे ईडीच्या आरोपावरून स्पष्ट होत असून पुढील तपासात आणखीही काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, नवाब मलिक याचे मंत्रिपद वाचविण्यासाठी खुद्द शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत असून मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून दाऊदच्या या हस्तकास संरक्षण देत आहेत, असा आरोप भांडारी आणि डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केला. संपूर्ण ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय, असा सवालही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रदेश सचिव संदिप लेले, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका अर्चना मणेरा, शहर सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणाऱ्या नवाब मलिकची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. नवाब मलिक यास वाचविण्याकरिता व सत्ता टिकविण्याकरिता आपण महाराष्ट्राचा अपमान करत असून, देशद्रोह्याची तरफदारी करत आहोत, याची ठाकरे सरकारला जाणीव नसावी, हे दुर्दैवी आहे. आघाडी सरकारच्या या लाळघोटेपणामुळेच महाराष्ट्राची नामुष्की होत असून, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कणाहीन नाही, हे दाखविण्यासाठी भाजपतर्फे तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. नवाब मलिक यांची हकालपट्टी आणि कठोर कारवाई करून दहशतवादास हातभार लावणाऱ्या देशद्रोह्याच्या पाठीराख्यांची महाराष्ट्र गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याऐवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा, असा उपरोधिक सल्लाही भांडारी यांनी ठाकरे सरकारला दिला.

Web Title: BJP | Nawab Malik | government should be expelled Nawab Malik from the cabinet, demand of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.