तरण तलावावरून भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली
By admin | Published: April 8, 2017 01:56 AM2017-04-08T01:56:33+5:302017-04-08T01:56:33+5:30
विकासकामांच्या श्रेयावरून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुंपली आहे
पिंपरी : विकासकामांच्या श्रेयावरून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. ‘संभाजीनगर येथील जलतरण तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले आले. तलाव नागरिकांसाठी खुलाही केला आहे. श्रेयासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. या तलावाचे उद्घाटन करून दाखवावेच, असे आव्हान माजी महापौर मंगला कदम यांनी केले आहे. ‘निवडणुकीनंतरही हा तलाव बंदच होता. यामध्ये श्रेय वादाचा प्रश्न नाही. ज्येष्ठ नेत्यांनी हा विषय जास्त ताणू नये, असा सल्ला पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला.
संभाजीनगर येथील जलतरण तलाव उभारला असून त्यांचे उद्घाटन डिसेंबर महिन्यात झाले होते. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर शनिवारी उद्घाटन भाजपाकडून करण्यात येणार आहे. त्याच्या निषेध कदम यांनी केला. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात विरोधी पक्षनेते योगेश बहल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक श्याम लांडे, नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेवक नीलेश पांढारकर, फजल शेख आदी उपस्थित होते.
मंगला कदम म्हणाल्या, ‘‘नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रभागात चमकोगिरी सुरू आहे. तलावाच्या उद्घाटनाची स्टंटबाजी सुरू आहे.’’(प्रतिनिधी)
योगेश बहल म्हणाले, ‘‘ज्या नगरसेवकांनी हा प्रकार चालविला आहे. त्यांचीच महापालिकेत सत्ता आहे. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात इतर प्रभागाच्या तुलनेत अधिकचा निधी उपलब्ध करून घेत प्रभागात नवी विकासकामे उभारण्यासाठी काम करावे.’’
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘संभाजीनगरातील तरण तलावाचे निवडणुकीच्या घाई गडबडीत उद्घाटन केले होते. निवडणुकीनंतरही हा तलाव बंदच होता. यामध्ये श्रेय वादाचा प्रश्न नाही.’’