भाजपा-राष्ट्रवादीचा दोस्ताना!

By Admin | Published: March 12, 2015 01:38 AM2015-03-12T01:38:41+5:302015-03-12T01:38:41+5:30

जातीयवादी पक्ष अशा शब्दात भाजपाची संभावना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील

BJP-NCP friendly! | भाजपा-राष्ट्रवादीचा दोस्ताना!

भाजपा-राष्ट्रवादीचा दोस्ताना!

googlenewsNext

मुंबई : जातीयवादी पक्ष अशा शब्दात भाजपाची संभावना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी भाजपाशी दोस्ती केली असून ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
सभापतींविरुद्धचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता ४० मतांची गरज असून तेवढी मते राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापकडे नसल्याने भाजपा या ठरावाला पाठिंबा देईल, असे भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्या ‘मैत्री’चा नवा अध्याय १७ मार्चपर्यंत पाहायला मिळणार आहे.
भाजपा या प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचे एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. सभापतीपद राष्ट्रवादीकडे गेल्यावर कदाचित उपसभापतीपदाची मागणीही भाजपाकडून केली जाणार नाही, असेही या मंत्र्याने सूचित केले. तसे झाल्यास विधान परिषदेतील सभापती, उपसभापती व विरोधी पक्षनेता ही तिन्ही पदे राष्ट्रवादीकडे येतील. वरील सभागृहात राष्ट्रवादीची मक्तेदारी निर्माण होऊ नये असा विचार भाजपाने केला तर उपसभापतीपदावर भाजपा दावा करील. तसे झाल्यास सभापतीपदी रामराजे निंबाळकर आणि उपसभापतीपदी फुंडकर यांना संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मांडण्याची अनुमती मागितली. हा प्रस्ताव मांडण्याकरिता दहा सदस्यांनी सभागृहात उभे राहण्याची गरज होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे २३ व शेकापचे जयंत पाटील सभागृहात उभे राहिले. विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी शिरगणती केल्यावर २४ सदस्यांचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. नियमानुसार पाठिंबा देणाऱ्या सदस्यांची संख्या पुरेशी असल्याने आता हा प्रस्ताव १७ मार्च २०१५ पर्यंत विचारात घेण्यात येईल, असे उपसभापती डावखरे यांनी सांगितले.
पुढील किमान दोन दिवस हा प्रस्ताव चर्चेला घेऊ नका, अशी मागणी काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केली तर हा प्रस्ताव कधी घेणार ते सायंकाळपर्यंत जाहीर करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर आपण निर्णय घेऊ व सर्व संबंधितांना कळवू, असे डावखरे यांनी सांगितले.
आता उपसभापती सभागृह नेते, विरोधी पक्षनेते व गटनेते यांची बैठक बोलावून अविश्वास प्रस्ताव चर्चेला कधी घ्यायचा त्याची तारीख जाहीर करतील. अविश्वास प्रस्तावावर सदस्यांची भाषणे होतील. खुद्द सभापती देशमुख यांना आपले मत व्यक्त करायचे असेल तर करता येईल. त्यानंतर ठराव मताला टाकण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: BJP-NCP friendly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.