भाजपा-राष्ट्रवादीत झोंबाझोंबी
By admin | Published: October 4, 2016 01:26 AM2016-10-04T01:26:18+5:302016-10-04T01:26:18+5:30
महापालिकेची प्रारूप प्रभागरचना फुडल्याच्या आक्षेपावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय झोंबाझोंबी सुरू आहे.
पिंपरी : महापालिकेची प्रारूप प्रभागरचना फुडल्याच्या आक्षेपावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय झोंबाझोंबी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, प्रारूप प्रभागरचना फुटल्याच्या वृत्ताचा पालिका प्रशासनाने इन्कार केला. आयुक्त दिनेश वाघमारे हे प्रशासनाची भूमिका मंगळवारी स्पष्ट करणार आहेत.
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्रे हलवून प्रभाग फोडल्याचे आरोप होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रभाग बदलल्याप्रकरणी आक्षेप घेणार असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे यांनीही प्रारूप प्रभागरचनेप्रकरणी टीका केली होती. राष्ट्रवादी-भाजपाने आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका केली आहे. चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका भाजपावर केली आहे. त्यावर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्या कक्षासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा; मग कोणी वॉर्ड फोडले, हे लक्षात येईल. राष्ट्रवादीच्या चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत, असे प्रतिटीका भाजपाने केली आहे. त्यामुळे प्रभागरचनेची ७ आॅक्टोबरला अधिकृत घोषणा होईपर्यंत भाजपा व राष्ट्रवादीत राजकीय झोंबाझोंबी सुरू
राहणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला होणार आहे. याविषयी प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम २० आॅगस्टला निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार आराखडा तयार करून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या समितीने निवडणूक आयोगाकडे अहवाल सात सप्टेंबरला सुपूर्त केला.
‘लोकमत’ने प्रारूप प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचे वृत्त
सर्वप्रथम दिले होते. त्यानंतर १० सप्टेंबरला ‘सत्तेसाठी सीमारेषा
बदलल्या’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्रिसदस्यीय समितीने
आराखडा मंजूर केल्यानंतर १३ सप्टेंबरला नगरसेवकांची झोप उडणार, १५ सप्टेंबरला इच्छुक नगरसेवकांनी घेतली धास्ती, दहा प्रभाग म्हणजेच ४० वॉर्ड फोडले, अशी वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने भाजपावर आणि भाजपाने राष्ट्रवादीवर प्रभाग बदलल्याचा आरोप केला होता.