भाजप-राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये 'या' बाबतीत चुरस; तर थोरात स्पर्धेतही नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:46 PM2019-10-07T16:46:36+5:302019-10-07T16:47:26+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे आयटी सेल सोशल मिडियावर सक्रीय झाले आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सोशल मिडियाचा वापर पाहिल्यास भाजप आघाडीवर असून, राष्ट्रवादीची नेतेमंडळी सुद्धा सोशल मिडियावरून सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसते.
- मोसीन शेख
मुंबई - 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात सोशल मिडियाचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी सोशल मिडियाचे महत्त्व जाणून त्याकडे मोर्चा वळविला. मात्र यात काँग्रेस पक्ष अजूनही पिछाडीवर दिसत आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सोशल वॉर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष सोशल मिडियावर सक्रीय असून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात मात्र स्पर्धेतही दिसत नाहीत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे आयटी सेल सोशल मिडियावर सक्रीय झाले आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सोशल मिडियाचा वापर पाहिल्यास भाजप आघाडीवर असून, राष्ट्रवादीची नेतेमंडळी सुद्धा सोशल मिडियावरून सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसते. मात्र काँग्रेसचे नेते थोरात सोशल मिडियावर सक्रीय नसल्याचे त्यांनी केलेल्या पोस्टच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटर हैंडलवरून 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या एक महिन्याच्या काळात 144 ट्विट केली असून 34 रिट्वीट केली आहेत. तर गेल्या सात दिवसांत त्यांनी 23 ट्विट केली असून 6 रिट्वीट केली आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या काळात 143 ट्विट केली आहे, तर 35 रिट्वीट केली आहेत. तर अक्टोबर महिन्याच्या या सात दिवसांत 32 ट्विट केली असून, 13 रिट्वीट केली आहेत.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या अधिकृत ट्विटर हैंडलवरून फक्त 15 ट्विट केली असून, 4 रिट्वीट केली आहेत. तर ऑक्टोबरच्या सात दिवसात त्यांनी 3 ट्विट आणि 2 रिट्वीट केली आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सोशल मिडियावर फारच मागे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
उद्धव ठाकरेंचं अधिकृत ट्विटर हैंडलचं नाही
ट्विटरवर एक्टीव्ह असण्यासंदर्भात शिवसेनेचा विचार केला तर, ट्विटरवर पक्षाचे अधिकृत अकाऊंट असून ते नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ट्विटरवर अधिकृत अकाऊंट नसल्याचे दिसून येते. तर मोजके मंत्री सोडले तर शिवसेनेचे नेते सुद्धा सोशल मिडियावर सक्रीय नसल्याचे पाहायला मिळते.