Nilesh Rane : "उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात"; निलेश राणेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:52 PM2022-07-25T16:52:13+5:302022-07-25T17:03:51+5:30
BJP Nilesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली असून ती २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रसिद्ध केला आहे. उद्धव ठाकरे स्वत: सुरतला गेले असते तर..? फुटीर लोकांनी विनंती केली आम्हाला गद्दार म्हणू नका. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता का? तुमची मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले? मुंबईचा घात करणारी योजना आपल्याला दिसतेय का? असे रोखठोक प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारले. यावरून आता भाजपाने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
"उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनीच घेतलेली आधीची मुलाखत आणि आताची मुलाखत असे दोन फोटो राणे यांनी ट्वीट केले आहेत. सत्ता होती तेव्हाची मुलाखत आणि सत्ता गेल्यानंतरची मुलाखत असं म्हणत त्यांनी ते दोन फोटो शेअर केले आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून "उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात" असं म्हटलं आहे.
उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात. pic.twitter.com/cBGTq6et41
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 25, 2022
हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु सत्तेची चटक लागली नाही या एका गोष्टीचं माझ्या मनात समाधान आहे. मी मुख्यमंत्री होईन असं बोललो नव्हतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या बहुचर्चित मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा एक फोटो ट्विट करुन याची माहिती दिली होती. आता मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करुन उद्धव ठाकरे यांच्या 'जोरदार' मुलाखतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या टिझरमध्ये उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवरील प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना दिसत आहेत. पहिल्या टिझरनंतर आता दुसरा टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी बेधडक सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याचं पाहायला मिळत आहे.