Nilesh Rane : "स्वतः दहावी दोनदा नापास..."; शिंदेंना ट्वीट करता येतं का? म्हणणाऱ्या राऊतांना निलेश राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 11:58 AM2022-07-08T11:58:33+5:302022-07-08T12:11:37+5:30
BJP Nilesh Rane Slams Shivsena Vinayak Raut : एकनाथ शिंदेंना स्वत:च्या हातानं ट्वीट तरी करता येतं का? अशी विचारणा केली होती. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून सातत्याने बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला जात आहे. यातच शिवसेनेच्या खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदेंना स्वत:च्या हातानं ट्वीट तरी करता येतं का? अशी विचारणा केली होती. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे नेते निलेश राणे (BJP Nilesh Rane) यांनी "स्वतः दहावी दोनदा नापास..." असं म्हणत विनायक राऊतांना (Shivsena Vinayak Raut) खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "खासदार विनायक राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते सांगतोय. हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो" असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते हा सांगतोय, हा स्वतः दहावी दोनदा नापास... जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 7, 2022
विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठे पाप झाले आहे. शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावे असे आव्हानही दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकले आहे असे ट्वीट करत प्रत्युत्तर दिले होते.
एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावे लागेल. कुणीतरी लिहून द्यायचे आणि ट्वीट करायचे. स्वत: च्या हाताने ट्वीट करता येते का? याचा अभ्यास करावा लागेल, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा कुटील डाव ४० अलिबाबा चोरांच्या माध्यमातून भाजपा खेळत असेल, तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार होती तर तुम्ही बैठकीत, चर्चेत हा मुद्दा मांडायला हवा होता. आता केलेल्या गद्दारीचं खापर शंभूराजे देसाई संजय राऊत यांच्यावर फोडत आहेत. उद्धव ठाकरे तुम्हाला सतत आवाहन करत असताना तुम्ही परत का आला नाहीत, असा सवाल राऊत यांनी केला आहे.