“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 02:45 PM2023-05-29T14:45:54+5:302023-05-29T14:46:58+5:30
Maharashtra Politics: संजय राऊतांनी ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दोन वेळा दिला आहे, असा दावा करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. यातच लोकसभा निवडणुकांसाठी जवळपास सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, भाजपविरोधी आघाडीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत, असा दावा भाजप नेत्याने केला आहे.
भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मीडियाशी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना एका वर्षात पुन्हा पक्ष बांधणी शक्य नाही. कारण तो त्यांचा पिंड नाही. त्यांना निवडणुकीसाठी चिन्ह मिळणार नाही. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत अशी माझ्याकडे खात्रीलायक माहीती आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव
संजय राऊत हे प्रश्न राष्ट्रवादीकडे घेऊन गेले होते. त्याबाबत त्यांनी बोलावे. जागावाटप करण्याची नाटके सोडून खरी माहीती त्यांनी सर्वांना द्यावी. संजय राऊत यांनी ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दोन वेळा दिला आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला. खरी माहीती आज ना उद्या बाहेर येईल, माझ्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा राष्ट्रवादीत विलीन करावी असा प्रस्ताव दिला गेला आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यातील लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे.