भाजपाचे आता स्वबळाचे उद्दिष्ट
By admin | Published: May 4, 2017 03:42 AM2017-05-04T03:42:44+5:302017-05-04T03:42:44+5:30
सत्तेत राहून शिवसेनेचे इशारे देणे, धमक्या देणे सुरू आहे. नोटीस पीरियड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच
कोल्हापूर : सत्तेत राहून शिवसेनेचे इशारे देणे, धमक्या देणे सुरू आहे. नोटीस पीरियड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच २०१९ ला कोणत्याही परिस्थितीत देशात ४०० खासदार आणि महाराष्ट्रात १४४ आमदार हे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. त्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; म्हणून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापूर महानगरच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बुधवारी ते बोलत होते. मंत्री पाटील यांनी आगामी दोन वर्षांतील भाजपचा नियोजित आराखडा मांडला. ते म्हणाले, २०१९ ची तयारी आता सुरू झाली आहे. केंद्रामध्ये आम्ही आणि मित्रपक्ष मिळून ३३८ आहोत; परंतु काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ४०० खासदार ‘कमळ’ चिन्हावरील हवेत. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातही मित्रपक्षांसह आपल्याकडे १३७ आमदार आहेत. शिवसेनेची त्यामुळे मदत घ्यावी लागली. त्यामुळे स्थिर आणि शांततेत राज्य चालण्यासाठी भाजपचे १४४ आमदार आणि मित्रपक्षासह १७० आमदारांचे ध्येय आम्ही ठेवले आहे. शहा तीन दिवस महाराष्ट्रात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देशभरात फिरण्यासाठी ७५ दिवसांचे नियोजन केले आहे. त्यातील १६ ते १८ मे असे तीन दिवस ते महाराष्ट्रात असतील. (प्रतिनिधी)
माझा उदो उदो नको
यापुढच्या काळात कोणीही भाषणात माझा उदोउदो करू नये. मी माझ्या राज्यासाठी, पक्षासाठी, लोकांसाठी, समाधानासाठी काम करतो. करायचीच असेल तर भगव्याची, पक्षाची स्तुती करा. माझी नको. तसे कराल तर तुमचे गुण प्लस न होता मायनस होतील, हे लक्षात घ्या, असा दमच यावेळी चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना भरला.